मालिकांमध्ये सतत नवीन ट्विस्ट येत असतात. आता ‘पारू'(Paaru) मालिकेत नवीन वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहे. किर्लोस्कर कुटुंबात काही दिवसांपूर्वी अनुष्काची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरातील सदस्यांची समीकरणे बदलताना पाहायला मिळत आहेत. अनुष्का ही स्वावलंबी, स्वाभिमानी तसेच एक यशस्वी उद्योजिका आहे. याबरोबरच, कोणत्याही संकटांना ती संयमाने सामोरे जाताना दिसते. त्यामुळे आदित्यसाठी अनुष्का योग्य असल्याचे अहिल्यादेवीला वाटते व ती तिची आदित्यसाठी निवड करते. अनुष्कानेदेखील आदित्यजवळ काही दिवसांपूर्वी तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आता अनुष्का पारू व आदित्यमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करित असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
पारू व आदित्यच्या मैत्रीत फूट पडणार?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनुष्का व पारू यांच्यात संवाद सुरू असल्याचे पाहायला मिळते. अनुष्का पारूला म्हणते, “आपण सगळ्यांनीच आदित्यला त्याचं काम करून दिलं पाहिजे. आपण सतत त्याच्या आजूबाजूला घुटमळत राहतो.फिरत राहतो. मग मला सांग तो त्याचं काम कसं करणार? पारू आता तरी आदित्यला फ्री ठेवशील ना तू?”, अनुष्काचे बोलणे ऐकल्यानंतर पारू तिला म्हणते, “तसंही माझी खरी जागा मला कळलीय.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पारू आदित्यपासून दुरावणार का ?”, अशी कॅप्शन दिली आहे.
पारू ही आदित्यच्या घरी नोकर म्हणून काम करते. मात्र, जेव्हा जेव्हा किर्लोस्कर कुटुंब संकटात असते, त्या त्या वेळी पारू त्यांना मदत करते. संकटातून वाचवते. आदित्यच्या आईला म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करला ती देवी आई म्हणते. अहिल्यादेवीचा ती खूप आदर करते. तिच्या एका शब्दासाठी ती काहीही करायला तयार होते. आदित्य व पारूमध्येदेखील चांगली मैत्री आहे. मात्र पारू आदित्यच्या प्रेमात पडली आहे. किर्लोस्करांच्या एका प्रॉडक्टची ती ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. याच प्रॉडक्टच्या एका जाहीरातीच्या शूटिंगवेळी आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. त्याला ती सर्व खरे आहे, असे समजते व आदित्यला नवरा मानते.
हेही वाचा: Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील ‘त्या’ सीनचं ‘असं’ होतं शूटिंग; पाहा व्हिडीओ
आता अनुष्काच्या आदित्यच्या आयुष्यात येण्याने अनेक गोष्टी बदलताना दिसत आहे. आता अनुष्का पारू व आदित्यच्या मैत्रीत दुरावा निर्माण करण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.