‘पारू'(Paaru) मालिकेत सध्या सातत्याने ट्विस्ट येत असल्याचे दिसत आहे. दिशा आणि अनुष्का या दोघी बहिणींनी एकत्र येत किर्लोस्करांना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केला आहे. त्या त्यांच्या प्लॅनप्रमाणे किर्लोस्करांना त्रास देत असतात. मात्र, त्यांचे सत्य पारूला समजते. त्यामुळे हरिशच्या मदतीने त्या पारूला त्रास देतात. त्यासाठी ते हरिशला पारूच्या भावाला म्हणजेच गणीला किडनॅप करण्यासाठी सांगतात. मात्र, हरिश हे सर्व नाइलाजाने करत असतो. तो पारूला सर्व सत्य सांगतो. ते दोघं यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच पाहायला मिळाले की, हरिशलादेखील दिशा-अनुष्काने मारून टाकले आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये गणी आणि पारू सुखरूप असल्याचे पाहायला मिळाले. गणीला दवाखान्यात दाखल केले आहे, तर पारू घरी आली आहे.
घरी आल्यानंतर पारू दिशा व अनुष्काने हरिशला मारल्याचे सर्वांना सांगते. ते ऐकून अहिल्यादेवीचा संताप होतो, तसेच पारूचे ती आभारही मानते. कायमच पारू किर्लोस्कर कुटुंबासाठी धावून येते. प्रीतमचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून तिने वाचवले होते. अनुष्काचे सत्य सांगण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही तिच्यावर विश्वास ठेवला नाही, असे म्हणत अहिल्या पारूचे आभार मानते. जेव्हा आदित्यचा जीव संकटात असल्याचे समजते, तेव्हा पारू पुन्हा एकदा काढून ठेवलेले मंगळसूत्र घालते. दुसरीकडे अनुष्का आदित्यला किडनॅप करते. पारू आणि प्रीतम दोघे आदित्यला शोधण्यासाठी बाहेर पडतात, तर अनु्ष्का अहिल्याला फोन करून आदित्यला तिने किडनॅप केल्याचे सांगते आणि तिला एकटीला भेटायला बोलावते. तसेच पोलिसांना कळवू नको, अशी धमकीही देते. याबरोबरच ती कुठे आहे हेदेखील अहिल्यानेच शोधावे असे ती सांगते. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेत पुढे काय होणार याची झलक पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा प्रोमो शेअऱ केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला मोहन अहिल्याला अनुष्काचे लोकेशन ट्रेस झाल्याचे सांगतो. त्यानंतर अहिल्या अनुष्काने आदित्यला ज्या ठिकाणी किडनॅप केले आहे, तिथे जाण्यास निघते. याच प्रोमोमध्ये आदित्यला अनुष्काने बांधून ठेवले आहे. तो अनुष्काला म्हणतो, “आई तुला जिवंत सोडणार नाही.” त्यावर अनुष्का म्हणते, “मी अहिल्याला जिवंत सोडेल की नाही, याचा विचार कर.” दुसरीकडे अहिल्या पारूला फोन करून सांगते, “या सगळ्यात मला काही झालं तर सगळ्यांना तू सावरशील.” हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अनुष्काच्या तावडीतून आदित्यला सोडवू शकेल का अहिल्या?” अशी कॅप्शन दिली आहे.
आता पारू मालिकेत नेमके काय घडणार, दिशा व अनुष्का यांची किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची योजना यशस्वी होणार की पारू, अहिल्यादेवी आणि आदित्य त्यांची योजना त्यांच्यावरच उलटवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धमाकेदार ट्विस्टमुळे मालिकेत काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.