मालिकेत घडणाऱ्या नवनवीन घटना, ट्विस्ट यांमुळे पुढे काय होणार, कोणते नवीन वळण येणार हे समजण्याकरिता प्रेक्षक त्या मालिकेचा पुढील भाग पाहण्यास उत्सुक असतात. सकारात्मक पात्रांइतकीच नकारात्मक पात्रेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आता पारू (Paaru) मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुष्काची एन्ट्री झाली आहे. अनुष्का ही दिशाची बहीण आहे. किर्लोस्करांकडून दिशाचा जो अपमान झाला होता, त्याचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली आहे. किर्लोस्कर कुटुंबाला मात्र अनुष्का ही दिशाची बहीण असल्याचे माहीत नाही आणि आपली चांगली वागणूक भासवल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनुष्काने नकळत प्रत्येक किर्लोस्कर कुटुंबीयाच्या मनात घर केले. आता अनुष्का व आदित्यचे लग्न ठरले असून, लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. अनुष्काला पारू व आदित्यची मैत्री आवडत नाही आणि त्यामुळे ती त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. आता पारू मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून, अनुष्काने पारूविरुद्ध कट रचल्याचे पाहायला मिळत आहे.
अनुष्का करणार पारूविरुद्ध कारस्थान
झी मराठी वाहिनीने पारू मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, पारू कारजवळ थांबली आहे. आदित्य तिथेच जवळपास असून, तो पारूशी फोनवर बोलत आहे. तिथे काही तरुण पारूजवळ येतात आणि त्यातील एक माणूस पारूला म्हणतो की, मॅडम मी तुमचा लय मोठा फॅन आहे. एक फोटो देता का प्लीज? त्या व्यक्तीचे हे बोलणे ऐकल्यानंतर आदित्य आनंदाने म्हणतो ‘फॅन वगैरे’ असे म्हणत तिचे कौतुक करून, सहजपणे तिला त्यांच्यासह फोटो काढण्यास प्रोत्साहन देतो. अनुष्का मनातल्या मनात पारूला म्हणते की, तुझा आजचा दिवस तुझ्या आठवणीत राहणार आहे. तो माणूस पारूबरोबर फोटो काढण्यासाठी येतो आणि तिच्याजवळ उभा राहतो. पारू त्याला म्हणते की, जरा सरकून उभे राहता का? तो म्हणतो की, इतका चिकना माल समोर असताना कोणाची नियत बिघडणार नाही. त्यानंतर तो कसली तरी बाटली उघडतो. पारू त्या माणसाला विचारते की, काय करताय? आदित्य पारूला निघ तिथून, असे म्हणतच असतो; पण तितक्यात तो माणूस तिच्या चेहऱ्यावर शाई फेकतो. त्यानंतर अनुष्का हसताना दिसत आहे. यादरम्यान, अनुष्काने त्या माणसांना पैसे दिल्याचेदेखील पाहायला मिळाले.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘नवीन वर्षाच्या सुरुवातीला पारूवर येणार नवं संकट…!’, अशी कॅप्शन दिली आहे.
पारू मालिकेतील आदित्य, पारू, अहिल्यादेवी, प्रीतम, दामिनी अशी सर्वच पात्रे प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसतात. श्रीमंत घरातील सर्वांचा लाडका, हुशार, प्रेमळ असा आदित्य आणि होतकरू, कष्टाळू व लोकांची काळजी करणारी अशी पारू सर्वांची मने जिंकून घेते. या दोघांची चांगली मैत्री आहे. या सगळ्यात पारू आदित्यच्या प्रेमात पडली आहे. जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते आणि ती घटना तिने खरी मानलेली असते. परंतु, आता मात्र आदित्य व अनुष्काचे लग्न ठरले आहे.
आता आदित्य पारूला या सगळ्यातून कसे बाहेर काढणार, अनुष्का त्यांच्या मैत्रीत कशी फूट पाडणार, अनुष्काचे सत्य सर्वांना समजणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.