पारू'(Paaru) या मालिकेत सध्या नवीन वळण आल्याचे दिसत आहे. अनुष्काचा किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन सध्या यशस्वी होताना दिसत आहे. तिने चलाखीने पारूचे ब्रँड ॲम्बेसेडर हे पद काढून घेतले आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करला पारूचे ब्रँड ॲम्बेसेडर पद काढून घ्यावे अशी परिस्थिती अनुष्काने निर्माण केली होती. या सगळ्यात पारूविषयी अहिल्यादेवीच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे. आदित्य व अहिल्यादेवी यांच्यामध्ये दुरावा आला असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र पारूसमोर अनुष्काचे सत्य येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
शेवटी मी किर्लोस्कर…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अनुष्काचा गृहप्रवेश करण्यात आला आहे. अनुष्काच्या गृहप्रवेशावेळी पारूदेखील तिथे उपस्थित असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यावेळी पारूला आदित्यबरोबर शूटिंगवेळी जेव्हा लग्न झाले होते ते आठवल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अनुष्का तिच्या खोलीत असून ती आरशात पाहत म्हणते, “शेवटी मी किर्लोस्कर घरात व कंपनीत जागा मिळवलीच.”
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अनुष्का दोन माणसांना कसलीतरी बॅग देत आहे. पारू ते पाहते. हे दृश्य पाहिल्यानंतर पारू मनातल्या मनात म्हणते, “अनुष्का मॅडमनी यांना कसली बॅग दिली?”, त्यानंतर ती अनुष्काजवळ जाते व तिला म्हणते, “मला अजूनही विश्वास बसत नाही की त्या गुंडांना सोडविण्यासाठी तुम्ही पैसे दिले. हे समदं देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे.” पारूचे हे बोलणे ऐकूण अनुष्काला राग आल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अनुष्काचा खरा चेहरा पारू देवीआईसमोर आणू शकेल का..?”, अशी कॅप्शन दिली आहे.
पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे, पारू ही अशिक्षित असून किर्लोस्करांच्या घरात काम कऱणारी मारूती नावाच्या ड्रायव्हरची मुलगी आहे. अपघाताने ती किर्लोस्करांच्या प्रॉडक्टची ब्रँड ॲम्बेसिडर बनली. मात्र, तिने तिच्या मेहनतीने त्या पदावर काम केले. आता अनुष्काने तिचे हे पद जावे यासाठी कारस्थान केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी तिने काही गुंडांना पारूवर शाई फेकण्यास सांगितले होते. त्यानंतर आदित्यच्या अनुपस्थितीत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अहिल्यादेवीने पारूचे ब्रँड ॲम्बेसेडर पद काढून अनुष्काला देते.
आता पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवींसमोर आणणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.