Zee Marathi Paaru Serial : कंपनीच्या लोगोवर असणारे डोळे हे ‘पारू’चे आहेत हे सत्य मालिकेत आदित्यसमोर आलेलं आहे. डोळ्यांचं सत्य समोर येताच आदित्य घाईघाईने पारूकडे पोहोचतो, पण त्याआधीच पारू निघून गेलेली असते. पारू आणि आदित्य या दोघांनाही माहीत आहे की, ते एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांना त्यांच्या मर्यादाही ठाऊक आहेत. त्यांनी आपल्या भावनांना रोखून धरायचं ठरवलेलं आहे.
पारूमुळे आदित्यच्या आयुष्यावर परिणाम होतोय हे पाहिल्यावर मारूती पारूला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगतो. पारूला मारुतीने आदित्यविषयीची बंधनं घातलेली असतात तर, दुसरीकडे आदित्य आता पारूच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे.
घर सोडून गेलेल्या पारूला काहीही करून किर्लोस्करांच्या घरी परत आणायचं असं आदित्यने ठरवतो. आता निश्चय करून आदित्य अहिल्यादेवीची याबद्दल समजूत काढणार आहे. आदित्य त्याची आई अहिल्यादेवीला पारूला घरी आणण्यासाठी तयार करतो. पण, तो स्वतः एक निर्णय घेतो की, तो पारूला आपल्या प्रेमाची कबुली देणार नाही. तो तिचा आदर करेल, तिच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही.
गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे. आदित्य पारूला घरी आणण्यासाठी स्वत: वेगळ्या रुपात तिच्या गावच्या शेतात जाणार आहे. डॅशिंग आदित्य पारूवरच्या प्रेमोपोटी शेतात बुजगावणं बनून उभा असतो. याचदरम्यान पारू म्हणत असते, “आदित्य सरांशिवाय मला करमतच नाही.”
पारूच्या मनातल्या भावना ऐकून आदित्य म्हणतो, “पारू… आता इथून तुला मीच घरी घेऊन जाणार आहे.” आदित्य बुजगावणं झालेला असतो त्यामुळे सुरुवातीला पारू त्याला ओळखत नाही. शेवटी आदित्य तिला अडवतो आणि बुजगावणं बाजूला करून तिच्यासमोर येतो.
आदित्य पारूला म्हणतो, “पारू आता मला तुझ्याशिवाय करमेना झालंय आणि माझं संपूर्ण आयुष्य आता तुझं झालंय” पारू हे ऐकून प्रचंड भारवते आणि आदित्य तिला अलगद मिठीत ओढून घेतो. आता आदित्य आणि पारूची अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या २८ मार्चला संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. आदित्य आणि पारूचा प्रेमाचा प्रवास पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.