Zee Marathi Serial Paaru : ‘पारू’ मालिकेत सध्या अनुष्का आणि दिशा या दोन्ही खलनायिकांचा खरा चेहरा अहिल्यादेवीसमोर आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिची सख्खी बहीण अनुष्का ‘पारू’ मालिकेत एन्ट्री घेते आणि किर्लोस्कर कुटुंबीयांना उद्धवस्त करण्याचा प्लॅन करते. तिचा आणि आदित्यचा साखरपुडा सुद्धा होतो मात्र, वेळीच ‘पारू’समोर अनुष्काचं सत्य येतं.

‘पारू’ला सत्य समजल्यामुळे ती अनुष्काचं खरं रुप अहिल्यासमोर उघड करते. आता आपल्या होणाऱ्या सुनेवर अविश्वास कसा दाखवायचा असा विचार अहिल्या करते. पण, सावित्रीला मारहाण करून अनुष्काने घरातून पळ काढल्यावर अहिल्यादेवीला पारूच्या बोलण्यावर विश्वास बसतो.

अनुष्का आदित्यला किडनॅप करून अहिल्याकडे पैशांची मागणी करते. पारू खूप हुशारीने पैशांच्या सुटकेसमध्ये बसून आदित्य आणि अहिल्यापर्यंत पोहोचते. याठिकाणी अनुष्काला ती बोलण्यात गुंतवते आणि दिशाविरुद्ध भडकवते. या वेळेत अहिल्या आणि आदित्य एकमेकांची सुटका करून घेतात. अखेरीस अनुष्काचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड होतो आणि ती आगीत मरण पावते असा जबरदस्त ट्रॅक नुकताच या मालिकेत पाहायला मिळाला.

अनुष्काचं पात्र मालिकेत मरण पावल्याने साहजिकच अभिनेत्री श्वेता खरातची ही मालिकेतील भूमिका सुद्धा संपली आहे. यामुळेच तिने प्रेक्षकांचा निरोप घेत तिची मालिकेतून एक्झिट झाल्याचं सर्वांना सांगितलं आहे. श्वेता ‘पारू’ मालिकेतून बाहेर पडल्यावर तिचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. पण, मालिकेतून बाहेर पडताना श्वेताने तिच्या सहकलाकारांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. श्वेताने शेअर केलेल्या फोटोंमधून तिचं पारू, अहिल्या, सावित्री यांच्याबरोबर ऑफस्क्रिन बॉण्डिंग कसं आहे याचीही झलक पाहायला मिळत आहे.

श्वेता लिहिते, “नवीन सेटवर पाऊल ठेवणं कधीकधी कठीण असू शकतं पण, मला अपेक्षा नव्हती की माझ्या सहकलाकारांमध्ये मला खरीखुरी रत्नं सापडतील. या जगात अलीकडच्या काळात चांगली वागणूक मिळणं दुर्मिळ आहे पण, या सहकलाकारांनी दाखवून दिलं की दयाळूपणा, सहानुभूती आणि करुणा अजूनही अस्तित्वात आहे. व्यावसायिकता जपून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आम्ही अगदी सहजपणे एकमेकांशी जुळवून घेतलं. आमच्यात एक बॉण्ड तयार झाला. जणू काही आम्ही सगळे एकमेकांना फक्त काही दिवसांपासून नव्हे तर वर्षानुवर्षे ओळखतो. यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. येथील बहारदार सूर्यास्त, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं आनंदाने भरलेलं हास्य आणि जीवनात आनंद घेऊन येणारे विनोद…या सेटवर सगळं काही मिळालं. ग्रेटफुल…पारू!”

दरम्यान, अहिल्यादेवीची भूमिका साकारणारी मुग्धा कर्णिक आणि ‘पारू’ची भूमिका साकारणाऱ्या शरयू सोनावणेने श्वेताला पुढील प्रवासासाठी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर, सेटवरचे अनसीन फोटो सर्वांबरोबर शेअर केल्याने चाहत्यांनी श्वेताचे आभार मानले आहेत. आता श्वेता कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader