विनम्र, प्रेमळ, शांत, समजूतदार, मोठ्यांचा मान राखणारी, आदर करणारी अशी पारू सर्वांचे मन जिंकत असते. मात्र, अनेकदा तिला चुकीचे समजले जाते, तर अनेकदा तिच्यावर संकट येताना दिसते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पारू'(Paaru) मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसते. किर्लोस्करांच्या तसेच पारूच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही चढ-उतार येताना दिसतात. आता दिशा पारूला मारण्याचा कट रचत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदला घेण्यासाठी दिशा काय करणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनुष्का व दिशा यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. अनुष्का दिशाला म्हणते, “छोटासा का होईना मला आनंद मिळाला. प्रियाने तिच्या लाडक्या पारूला कानाखाली वाजवली आहे”, असे म्हणताना अनुष्काला खूप आनंद झाल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. अनुष्काचे हे बोलणे ऐकल्यानंतर दिशा तिरस्काराने म्हणते, “मला त्या पारूचे खूप हाल झालेले पाहायचे आहेत. त्यावर तिला समजावत अनुष्का म्हणते, “आपला फोकस पारू नाही अहिल्या असली पाहिजे.” दिशा तिला म्हणते, “त्याची अरेंजमेंटसुद्धा मी केली आहे. उद्या किर्लोस्कर कंपनीचा तो शेवटचा कार्यक्रम असेल.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, पारू देवाची पूजा करत असून तिच्या हातातून अगरबत्ती खाली पडते. ती मनातल्या मनात देवाकडे पाहत म्हणते की, देवा अनुष्का मॅडम म्हटल्याप्रमाणे काही आज विपरीत तर घडणार नाही ना? हा प्रोमो शेअर करताना पारूला सतावतेय काही विपरीत घडण्याची भिती…”, अशी कॅप्शन दिली आहे.

पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अहिल्यादेवी किर्लोस्करने पुन्हा एकदा पारूला ब्रँड अॅम्बेसिडर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मधला काही काळ हे पद अनुष्काकडे होते. आता पारू पुन्हा किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अॅम्बेसिडर बनली आहे. या निमित्ताने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात किर्लोस्कर कुटुंबाला नष्ट करण्यासाठी दिशाने एका खेळण्याच्या गाडीत बॉम्ब लपवल्याचे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, प्रीतमबरोबर खोटे प्रेमाचे नाटक करून दिशा किर्लोस्कर कुटुंबाच्या प्रॉपर्टीसाठी त्याच्याबरोबर लग्न करणार होती. मात्र, त्याचदरम्यान आदित्य व पारूने तिचे सत्य सर्वांसमोर आणले व अहिल्यादेवीने तिला तुरुंगात पाठवले. आता दिशा पुन्हा परतली असून तिने अहिल्यादेवीला खुले आव्हान दिले आहे, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे.