‘पारू'(Paaru) ही मालिका नेहमीच नाट्यमय घडामोडींनी भरलेली असते. पारू आदित्यला नवरा मानते पण त्याच्यावर प्रेम असल्याचे त्याला किंवा इतरांना सांगत नाही. आदित्य पारुला चांगली मैत्रीण मानतो. आता काही दिवसांपूर्वी त्याच्या आयुष्यात अनुष्का आली आहे. लवकरच अनुष्का व आदित्यचे लग्न होणार आहे. अनुष्काचे आदित्यवर प्रेम नाही, मात्र किर्लोस्कर कुटुंबाचा बदला घेण्यासाठी ती चांगले वागण्याचे नाटक करत आहे. आता या सगळ्यात पारू मालिकेत ट्विस्ट येणार आहे. मालिकेत दिशाची पुन्हा किर्लोस्करांच्या आयुष्यात एन्ट्री होणार आहे.
दिशा पुन्हा येणार…
झी मराठी वाहिनीने सोशल मिडीयावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिशाची पुन्हा एकदा धमाकेदार एन्ट्री झाल्याचे दिसत आहे. प्रोमोच्या सुरूवातीला पाहायला मिळते की किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर काही गाड्या थांबतात. त्यामधून काही बॉडीगार्ड बाहेर येतात. पुढे पाहायला मिळते की दिशा परत आली आहे. यावेळी दिशाच्या आवाजात ऐकायला येते, “मी लढले, मी शिक्षा सहन केली, पण हरले नाही. मी पुन्हा आलीये आणि यावेळी पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने आलीये.” दिशाला पाहून किर्लोस्करांच्या घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे दिसत आहे. दिशा अहिल्यादेवीला म्हणते, “सासू मॉम मी परत आलीये.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “किर्लोस्करांच्या कुटुंबात ‘ती’ परत येतेय…!”, अशी कॅप्शन दिली आहे.
पारू मालिकेचा हा जबरदस्त प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट केल्या आहेत. “खलनायक असा पाहिजे की तो आल्याने राग नाही आनंद झाला पाहिजे”, “नाद खुळा एन्ट्री. आता होणार राडा. फक्त दिशा”, “वाह! दिशा परत आली”, तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेदेखील कमेंट करीत पूर्वा शिंदेचे कौतुक केले आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_8b5e6d.png)
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_4280fd.png)
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_5d0cda.png)
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_5a9097.png)
पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे, दिशा व प्रीतम यांचे लग्न ठरले होते. दिशाचे प्रीतमवर प्रेम नव्हते. मात्र, किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीसाठी ती प्रीतमबरोबर लग्न करणार होती. अहिल्यादेवीने हे लग्न ठरवले होते. पण, प्रीतमचे प्रियावर प्रेम होते. पारू व आदित्यने एकत्र येत दिशाचे सत्य सर्वांसमोर आणले होते. दिशाचे सत्य समजताच तिला अहिल्यादेवीने तुरूंगात पाठविले होते. त्यानंतर प्रीतम व प्रियाच्या लग्नाला मान्यताही दिली होती. दिशाला शिक्षा झाल्यानंतर काही दिवसातच दिशाबरोबर ज्या गोष्टी झाल्या त्याचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली. तिने तिच्या स्वभावाने सर्वांचे मन जिंकले. आत्मविश्वासू, यशस्वी, धाडसी, स्वत:च्या मतावर व निर्णयांवर ठाम असणारी अनुष्का सर्वांची आवडती झाली. सर्वांनी अनुष्का व आदित्यचे लग्न व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. अहिल्यादेवीने आदित्यसाठी अनुष्काची निवड केली. आता लवकरच आदित्य-अनुष्का लग्नबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान, मालिकेत दिशा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदेने साकारली आहे.आता दिशाच्या येण्याने मालिकेत या ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.