अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे हे कलाकार सध्या ‘पारू'(Paaru) या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. प्रसादने या मालिकेत आदित्य ही भूमिका साकारली असून शरयूने पारू ही भूमिका साकारली आहे. याबरोबरच मालिकेत मुग्धा कर्णिक, श्वेता खरात, पूर्वा शिंदे हे व इतर कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. उच्चशिक्षित, हुशार, होतकरू, प्रेमळ, आईचा लाडका व तिच्या शब्दाखातर काहीही करण्यास तयार असणारा आदित्य सर्वांचा लाडका आहे. तर दुसरीकडे, गरीब घरातील पारू वडिलांप्रमाणेच आदित्यच्या म्हणजेच किर्लोस्करांच्या घरात काम करते.
हरीश सर सत्य काहीतरी…
पारूचे वडील म्हणजेच मारुती वर्षानुवर्षे किर्लोस्करांच्या घरात ड्रायव्हर म्हणून काम करतात. किर्लोस्कर कुटुंबाचे भले व्हावे, ते कुटुंब आनंदात रहावे असे त्यांना नेहमी वाटते. पारूलादेखील वडिलांप्रमाणेच किर्लोस्कर कुटुंबाप्रति आस्था आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करला ती देवी मानते व तिचा शब्द हा तिच्यासाठी शेवटचा असतो. आता या सगळ्यात पारूच्या लग्नाचे सत्य समोर येणार का, असा प्रश्न समोर आलेला प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, किर्लोस्कर कुटुंबातील सर्व जण एकत्र जमले आहेत. तिथे पारू, तिचे वडील मारुती व हरीश हेही दिसत आहेत. पारूचे हरीशबरोबर लग्न ठरले होते, मात्र हरीश ऐन लग्नावेळी गायब झाला होता. कारण त्याला पारूने सांगितले होते की जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान, जेव्हा आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते, तेव्हापासून तिला ते नाते खरे वाटत आहे. त्यानंतर हरीश गायब झाल्याचे पाहायला मिळाले. आता तो पुन्हा एकदा पारूच्या आयुष्यात परतला आहे. गुंड प्रीतमला मारत असताना हरीश त्याला वाचवतो. त्यानंतर प्रीतम हरीशला घरी घेऊन आला आहे. त्याला पाहताच पारूला धक्का बसला होता. हरीशला पाहिल्यानंतर दामिनी त्याला विचारते, “मला एक कळत नाहीये, नेमका गुंडांच्या इथे तूच कसा पोहोचलास रे?” पुढे पारू रडत म्हणते की, हरीश सर सत्य काहीतरी वेगळंच… तेवढ्यात हरीश तिला थांबवतो व म्हणतो, “आज तरी मला बोलू दे” त्यानंतर तो पारूच्या वडिलांकडे जातो व म्हणतो, “पारूबरोबर लग्न न करण्यासाठी मी जे कारण तुम्हाला सांगितलं होतं ते खोटं होतं”, हरीशचे हे बोलणे ऐकूण मारुतीसह सर्वांना धक्का बसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना, “हरीश सगळ्यांना सत्य सांगेल…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, मालिकेत दाखविल्याप्रमाणे आदित्य व अनुष्काचे लवकरच लग्न होणार आहे. मात्र, अनुष्काचे आदित्यवर प्रेम नसून ती किर्लोस्कर कुटुंबाचा बदला घेण्यासाठी आली आहे. आता हरीश सर्वांना काय सांगणार, पारू व त्याचे लग्न पारूमुळे मोडले होते, हे सत्य तो सर्वांना सांगणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.