शरयू सोनावणे व प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेली पारू(Paaru) ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत असल्याचे दिसत आहे. शरयूने या मालिकेत पारू ही भूमिका साकारली आहे. तर प्रसाद आदित्य या भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच दिशाची मालिकेत पुन्हा एन्ट्री झाली आहे. पुन्हा येताच तिने अहिल्यादेवीला खुले आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. आता दिशा व अनुष्का या दोघी बहिणी किर्लोस्कर कुटुंबाविरूद्ध कट कारस्थान करत असल्याचे दिसत आहे. आता पारू या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे.

किर्लोस्कर कुटुंबातील एकही माणूस जिवंत…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पारू’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दिशा व अनुष्का यांच्यात संवाद सुरू आहे. अनुष्का दिशाला म्हणते की तू बाहेरून वार करतच आहेस, मी आतून घर पोखरते. आता यापुढे मी असा प्लॅन करेल. ज्यामुळे या किर्लोस्कर कुटुंबातील एकही माणूस जिवंत राहणार नाही. दुसरीकडे सावित्री पारूला म्हणते की आपल्याला अहिल्या मॅडमला सगळं सांगायला हवं. पारू म्हणते, किर्लोस्कर कुटुंबावर वार करण्याआधी त्यांना माझा सामना करावा लागेल. हा प्रोमो शेअर करताना, “अनुष्का आणि दिशाच्या जीवघेण्या प्लॅनला रोखू शकेल का पारु?”, अशी कॅप्शन दिली आहे.

पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे, ‘पारू’ ही किर्लोस्करांच्या घरात काम करणारी आहे. पारूचे वडीलही किर्लोस्करांचे ड्रायव्हर म्हणून काम करतात. पारूने आदित्यला मनोमन नवरा मानले असून ती स्वत:ला किर्लोस्करांची मोठी सून समजते. याबरोबरच, अहिल्यादेवीप्रति तिच्या मनात मोठा आदर आहे. अहिल्यादेवीच्या एका शब्दासाठी ती काहीही करायला तयार होते. आदित्यवर कोणतेही संकट आले तरी त्या सगळ्याला धैर्याने सामोरे जात, त्यातून आदित्यला बाहेर काढते. आदित्यदेखील तिला चांगली मैत्रीण मानतो.

दिशाने किर्लोस्कर कुटु्ंबाविरूद्ध कारस्थान रचण्याचे कारण म्हणजे, दिशा व प्रीतमचे लग्न ठरले होते. हे लग्न अहिल्यादेवीनेच ठरवले होते. मात्र, आदित्य व पारूच्या प्रयत्नांमुळे दिशा प्रीतमवर प्रेम असल्यामुळे नाही तर किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीसाठी लग्न करणार असल्याचे सर्वांना समजले. त्यानंतर अहिल्यादेवीने तिला तुरूंगात पाठविले होते. त्यादरम्यान अनुष्काने किर्लोस्करांच्या आयुष्यात स्थान निर्माण केले. अनुष्का व दिशा बहिणी असून त्या किर्लोस्करांविरूद्ध कट रचत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader