Pahalgam Terrorist Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याबद्दल सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातूनही या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे.
पहलगाम हल्ल्याबद्दल प्रसाद खांडेकर संतप्तजनक पोस्ट
अशातच अभिनेता प्रसाद खांडेकरनेदेखील पहलगाम हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “साला हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक लपून येतात आणि दहशतवाद माजवून पुन्हा बिळात लपतात. १४६ करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला हादरवतात. भ्याड भ्याड भ्याड… अतिशय तीव्र शब्दात निषेध. माणूस म्हणून जगायचं नाहीच का? जे मृत्युमुखी पडलेत त्यांचा नेमका दोष काय?”
“गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो पण…”
यानंतर त्याने असं म्हटलं आहे की, “वर्षभर कष्ट करून नोकरी धंद्यातुन वेळ काढून आपल्या बायका पोरांना, कुटुंबाला वेळ दिला हा दोष आहे? की, व्हेकेशन स्वित्झर्लंडला नको आपल्या भारतातच एवढी स्थळ आहेत. काश्मीरचा बहुतांश आर्थिक डोलारा हा पर्यटनावर आहे, आपण त्यांना मदत करूया. भारतातच फिरुया हा दोष आहे? मी खरंच गेल्या महिन्यात विचार करत होतो की, यंदा काश्मीरला फिरायला जाऊया. पण आत्ता मी माझ्या नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन तिथे जाण्याच्या हिंमत कशी करेन.”
“दहशतवादाचं समूळ उच्चाटन हा एकच पर्याय आहे”
यापुढे प्रसादने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “अन्न, वस्त्र, निवारानंतर स्वतःच्या जीवाची हमी, सुरक्षा ही गरज आहे. त्यांनतर विकास, आर्थिक महासत्ता ,5जी , समुद्रखालून ट्रेन, मोठा ब्रिज, बुलेट ट्रेन, टनेल फिनेल, मंगळावर चंद्रावर स्वारी, ऑलम्पिक पदक, परराष्ट्र धोरण, मोठे धार्मिक स्थळ, उच्च शिक्षण, ईलेक्ट्रिक गाड्या, सगळं सगळं बघूया… आधी जीवाची गॅरंटी द्या जे मूलभूत आहे आणि त्यासाठी दहशतवादाचं समूळ उच्चाटन हा एकच पर्याय आहे.”
पहलगाम हल्ल्याबद्दल बॉलीवूडसह मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया
यापुढे प्रसादने “मृत्युमुखी पडलेल्या ‘सामान्य’ जनतेला भावपूर्ण श्रद्धांजली” असं म्हटलं आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्याबद्दल मराठीतील सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, सुव्रत जोशी, स्वप्नील जोशी, शरद केळकर, सुबोध भावे, आदीनाथ कोठारे, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, तेजस्विनी पंडीत, तेजश्री प्रधान, सौरभ गोखले यांसह अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. याशिवाय अक्षय कुमार, सोनू सुद, अजय देवगण, सुनिल दत्त, अनुपम खेर या बॉलीवूड कलाकारांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.