Pahalgam Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला आहे मृत्यूच्या या रक्तरंजित खेळामुळे अख्खा देश हादरला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
बॉलीवूडसह मराठी मनोरंजन क्षेत्रातूनही या घटनेबद्दल कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच पहलगाम हल्ल्याबद्दल मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळेने कवितेच्या माध्यमातून तिची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्रीने तिच्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवानीची ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या कवितेला कमेंट्स करत दाद दिली आहे. तिच्या कवितेचं अनेकांनी कौतुकही केलं आहे. शिवानीची ही कविता अशी आहे की…
पहिली गरज, पहिली भूक कधीच रक्तपात नसते…
नाळ कुठेही जोडलेले असो, पहिली हाक, पहिला शब्द कधीच बंदूक नसतो…
पहिल्यांदा वाटलेली भीती मात्र सगळ्या धर्मात सारखी असते,
नीट वागलं नाही तर बागुलबुवा घरात घुसून मारले हा.. ही धास्ती घातलेली असते…
वर्ष सरतात, अक्कल येते, आवाज फुटतो, चीड येते…
बागुलबुवा कधीही येईल म्हणून भीतीला कुरवाळण्याची सवय लागलेली असते…
मुलं होतात, मुलांना मुलं होतात, भीती टिकते, काळ बदलतो, नुसतं कुलूप आता पुरेसं नसतं,
बागुलबुवा आता घरात नाही तर मनात राहत असतो…
माणसं भेटतात, विचार बदलतात, कुंपणापलीकडे मैत्रीचा करारही होतो,
मनातल्या मनात मात्र बागुलबुवा काळ्या दगडावरची पांढऱ्या रेषेसारखा हट्टी असतो…
पत वाढते, बिरुदं चिकटतात, संस्कार होतात, पुन्हा पुन्हा होतात…
माझं, आमचं, आमच्यातल्यांचं आता तर बागुलबुवा घेऊन जाईल असं बरंच काही असतं…
भीती वाढते, खूप वाढते, चार माणसांत वाटली जाते,
डोकं आणि दरवाजा बंद होतो,
कुणी काही करायच्या आत तो स्वत:च बागुलबुवा होऊन बसतो…
मीच भीती, मीच शस्त्रही होतो, जबाबदारी घेतो, शौर्यही गाजवतो…
कसं काय माहित? पण लहानपणी घाबरलेला मी दुसऱ्यांच्या गोष्टीत बागुलबुवा ठरतो…
दरम्यान, शिवानीसह स्वप्नील जोशी, शरद केळकर, सुबोध भावे, सौरभ गोखले, तेजश्री प्रधान आणि तेजस्विनी पंडित यांनीही पोस्ट शेअर केल्या आहेत. याशिवाय अक्षय कुमार, सोनू सुद, अजय देवगण, सुनिल दत्त, अनुपम खेर या बॉलीवूड कलाकारांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.