‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिका चांगली गाजली होती. अभिनेत्री तन्वी मुंडले, विवेक सांगळे आणि निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर दोन वर्ष अधिराज्य गाजवलं. गेल्या एप्रिल महिन्यात ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाले. अभिनेत्री तन्वी मुंडले ‘हाऊसमेट्स’, ‘मेरी’ या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळाली. नुकताच तन्वीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संकर्षण कऱ्हाडे आणि वंदना गुप्ते तिला चापट मारताना दिसत आहेत. नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…
काही दिवसांपूर्वी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने गणपतीचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ शेअर करत नवीन नाटकाची तयारी सुरू असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या नाटकात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते असल्याचं संकर्षणने जाहीर केलं. आता या नाटकातल्या तिसऱ्या पात्राचा खुलासा करण्यात आला आहे. हे पात्र म्हणजे अभिनेत्री तन्वी मुंडले.
तन्वी मुंडलेने चाहत्यांना हीच आनंदाची बातमी देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. “संकर्षण कऱ्हाडे आणि वंदना गुप्ते या प्रमुख कलाकारांबरोबर या नाटकातील तिसरं पात्र म्हणजे तन्वी मुंडले…गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित नवं नाटक लवकरच…”, असं कॅप्शन लिहित तन्वीने व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये संकर्षण कऱ्हाडे, वंदना गुप्ते आणि तन्वीने ट्रेंडिंग रील व्हिडीओ केला आहे. शेवटी संकर्षण व वंदना गुप्तेंनी तन्वीला चापट मारत तिचं वेलकम केल्याचं पाहायला मिळत आहे.
संकर्षण, वंदना गुप्ते आणि तन्वी यांच्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता शशांक केतकर, अक्षया नाईक, अनुष्का सरकटे, विवेक सांगळे, भाग्यश्री दळवी, सचिन देशपांडे, अमित रेखी या कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसंच चाहत्यांनी तन्वीला नव्या नाटकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, तन्वी मुंडले ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तन्वीसह शशांक केतकर, आशय कुलकर्णी पाहायला मिळाला होता. पण तन्वीची ही मालिका अवघ्या पाच महिन्यात गुंडाळली होती.