बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेतच मात्र ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने वेगळी ओळख मिळाली. आपल्या शैलीत ते या कार्यक्रमाचे होस्टिंग करतात. हा कार्यक्रमदेखील मूळ इंग्रजी कार्यक्रमावर बेतला आहे. भारतात कौन बनेगा करोडपतीचे अनेक चाहते आहेत. हा कार्यक्रमदेखील हिट आहे. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर आता पाकिस्तानमध्ये एक कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘टॅक्सी कॅश’.

‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम एका स्टुडिओमध्ये होतो मात्र हा पाकिस्तानी कार्यक्रम चक्क चालत्या फिरत्या गाडीत होणार आहे म्हणून याचं नाव आहे ‘टॅक्सी कॅश’. टॅक्सी कॅश हा दोन कार्यक्रमांचा मिळून बनला आहे, ज्यातील एक कार्यक्रम आहे ‘कारपूल कराओके’ आणि दुसरा ‘कौन बनेगा करोडपती’. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे खालिद मलिक करत आहे. खालिद मालिक पाकिस्तानच्या रस्त्यांवर गाडी चालवत हा प्रेक्षकांशी खेळ खेळणार आहे.

जुळ्या मुलांना गाणे ऐकवायला गेला करण जोहर, वैतागून त्यांनी केलं असं काही की…

या कार्यक्रमाच्या रुपरेषेबद्दल खालिद म्हणाला की ‘या कार्यक्रमात प्रवासी जेव्हा टॅक्सी बुक करेल तेव्हा तो ज्या ठिकाणी बसेल तिथपासून ते तो ज्या ठिकाणी जाणार आहे त्या जागेपर्यंत त्याला मी प्रश्न विचारणार, प्रामुख्याने हे प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित असतील. यात स्पर्धकाला आपल्या ज्या ठिकाणी पोहचायचे आहे त्याच्याआधीच या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत तरच त्याला बक्षीस मिळणार आहे. जो स्पर्धक तीनदा चुकेल त्याला गाडीतून खाली उतरावे लागेल’. या कार्यक्रमाची थट्टा सोशल मीडियावर होत आहे.

‘टॅक्सी कॅश’ हा कार्यक्रम ३ ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. आजतागायत याचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. पाकिस्तानात हा कार्यक्रम हिट होईल का हे काही दिवसात कळलेच. भारतीय ‘फिअर फॅक्टर’ हा कार्यक्रमदेखील त्यांनी कॉपी केला आहे.