अभिनेत्री पल्लवी जोशींबरोबरच्या गप्पांच्या मैफिलीमध्ये ‘कोण होणार करोडपती?’चा आज विशेष भाग रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर आज त्या बसणार आहेत. त्यासंबंधीचे प्रोमो व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये पल्लवी जोशी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पल्लवी जोशी यांनी फक्त मराठी आणि हिंदी नाही, तर गुजराती मनोरंजनसृष्टीतही काम केलं आहे. अभिनयाबरोबरच त्यांच्या सुरेल आवाजाचेही चाहते आहेत. दरम्यान, ‘कोण होणार करोडपती?’च्या मंचावर पल्लवी यांनी एक बालपणीचा प्रसंग सांगितला; ज्यावेळी त्यांचा अहंकार खूप दुखावला होता.

अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाल्या, “त्या काळात माझा दादा फक्त बालकलाकार नव्हता; तर स्टार बालकलाकार होता, खऱ्या अर्थानं. त्याची जी प्रसिद्धी होती, ते पाहून मला वाटायला लागलं की, आपण मागे पडू. मास्टर अलंकारला सगळे ओळखतात आणि असाच एक प्रसंग घडला होता. एके दिवशी त्याच्या गाडीभोवती लोकांनी गराडा घातला. मग ते लोक मास्टर अलंकार, मास्टर अलंकार करायला लागले. ते पाहून माझा अहंकार खूप दुखावला होता. पल्लवीच नाव घेत नाहीयेत म्हणजे काय, असं झालं होतं. मग मी बाबांना जाऊन सांगितलं. तर बाबा मला म्हणाले, ‘तू काम करायला तयार नाहीयेस. नाही तर सगळे तुलाही ओळखतील.’ त्या दिवशी मी ठरवलं आता आपण हो म्हणायला पाहिजे. मग मी थोडा विचार केला आणि अखेर मी काम करायला तयार आहे, असं सांगितलं.”

हेही वाचा – Video: सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या तारुण्याचं रहस्य काय? जाणून घ्या

“यावेळी मी गंभीरपणे काम करायला तयार झाले. बाबांचे एक मित्र होते शांतीलाल सोनी. ते एक चित्रपट बनवत होते. त्या चित्रपटात सचिन-सारिका ही प्रमुख पात्रं होती. त्यामधील मला सारिकाचं बालपणीचं पात्र करायचं होतं. शांतीलाल विचारतच होते की, पल्लवी करेल का? तेव्हा बाबांनी शांतीलाल यांना फोन केला आणि पल्लवी काम करायला तयार आहे, असं सांगितलं. तो चित्रपट मी केला. गुजरातीमध्ये तो चित्रपट अप्रतिम चालला. त्या चित्रपटानं ‘सिल्व्हर ज्युबिली’ केली होती. माझ्याकडे पहिल्याच चित्रपटाची ट्रॉफीसुद्धा आहे. पण, तो चित्रपट हिंदीत जबरदस्त आपटला.”

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मंदार जाधवने दुसऱ्याच्या लग्नात उरकला होता स्वतःचा साखरपुडा; खुलासा करत म्हणाला…

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

पुढे पल्लवी जोशी म्हणाल्या, “त्याच चित्रपटासाठी मला गुजरात सरकारकडून ‘सर्वोकृष्ट बालकलाकार’चा पुरस्कार मिळाला. तो घेण्यासाठी आम्ही जेव्हा अहमदाबादला पोहोचलो. तेव्हा तो चित्रपट चित्रपटगृहात सुरू होता. मग तिथल्या एका चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकानं आम्हाला बोलावलं होतं. तेव्हा आम्ही चित्रपट बघायला गेलो आणि मध्यांतरानंतर आम्ही निघालो. कारण- आम्हाला पुरस्कार सोहळ्याला जायचं होतं. आम्ही गाडीत बसलो त्या वेळेस गाडीभोवती गर्दी झाली आणि लोक म्हणायला लागले, ‘ही बघा छोटी पल्लवी’. तेव्हा मला असं वाटलं, सार्थक झालं आपलं.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pallavi joshi share childhood memories in kon honaar crorepati pps