‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून विशाखा सुभेदार घराघरात पोहोचली. विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर विशाखाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. विशाखा फक्त विनोदी भूमिका नाही तर विविधांगी भूमिका तितक्याच उत्तम रित्या निभावते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेतील तिची रागिणीची भूमिका. ज्याप्रमाणे या मालिकेतील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या भूमिकेवर प्रेम केलं जात त्याप्रमाणे विशाखा सुभेदारने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आज विशाखा सुभेदारचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने इतर कलाकार मंडळींसह चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसत आहेत.
विशाखा सुभेदारच्या वाढदिवसानिमित्ताने लेक अभिनय सुभेदारने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. तो सध्या परदेशात आहे. त्यामुळे त्याने पोस्ट शेअर करतात मिस यू असं लिहित आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशाखा सुभेदारचा खास मित्र पंढरीनाथ कांबळेनेही खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंढरीनाथ कांबळेने कर्नाटकातील मुर्डेश्वर मंदिरा बाहेरील विशाखा सुभेदारबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे, “या मंदिराच्या उंची पेक्षाही उंच भरारी घे घारी सारखी… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माऊली.” पंढरीनाथची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
दरम्यान, विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘शुभविवाह’ मालिकेसह ती चित्रपट आणि नाटकही करत आहे. नुकताच तिचा ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. पुष्कर जोगच्या या चित्रपटात विशाखाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘The दमयंती दामले’ या तिच्या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात विशाखासह पल्लवी केळकर, सुकन्या काळण, सागर खेडेकर, संजीव तांडेल, वैदेही करमरकर, क्षितिज भंडारी, संजय देशपांडे हे कलाकार पाहायला मिळत आहेत.