CID 2: गेल्या काही दिवसांपासून ‘सीआयडी २’ मालिकेची खूप चर्चा रंगली आहे. या चर्चेमागचं कारण आहे एसपी प्रद्युमन. ‘सीआयडी २’ मालिकेत एसपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे एसपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची मालिकेतून एक्झिट झाली आहे. पण, काही दिवसांपूर्वी वृत्त आलं होतं की, काही काळानंतर एसपी प्रद्युमन म्हणजे शिवाजी साटम यांची एन्ट्री मालिकेत होणार आहे. अशातच नवीन एसीपी आयुष्मानची ‘सीआयडी २’ मालिकेत एन्ट्री झाली आहे. याचे प्रोमो सध्या चर्चेत आले आहेत.
अभिनेता पार्थ समथान नवीन एसीपी आयुष्मानच्या भूमिकेत झळकला आहे. एन्ट्री होताच एसीपी आयुष्मानने दया-अभिषेकला धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. दया-अभिषेक एसीपी आयुष्मानने दिलेल्या ऑर्डर्सचं पालन करताना दिसत आहेत. ‘सोनी टीव्ही’ने याचे प्रोमो शेअर केले आहेत.
पहिल्या प्रोमोमध्ये, नवीन एसीपी आयुष्मानला पाहून दया मनातल्या मनात म्हणतो की, १८ वर्ष सीआयडीमध्ये काम केल्यानंतर याच्याकडून ऑर्डर घ्यावी लागेल. तर अभिषेक म्हणतो, “मोठं मोठ्या गुन्हेगारांना हाताळलं आहे. तर या लहान मुलाला पण समजून घेऊ.” दुसऱ्या प्रोमोमध्ये, एसीपी आयुष्मान दया-अभिषेकशी संवाद साधताना दिसत आहे. तेव्हा एसीपी आयुष्यमान म्हणतो, “कधीपर्यंत एसीपी प्रद्युमनच्या निधनावर रडतं बसणार? ज्या काही वेदना, दुःख आहे. ते एका टोपलीत बांधून ऑफिसच्या बाहेर लटकवून येत जा. चला आता काम करा.”
त्यानंतर तिसऱ्या प्रोमोमध्ये एसीपी आयुष्मान म्हणतो, “मला प्रभावित करणारी एकमेव गोष्ट म्हणजे निकाल.” यावर दया म्हणतो की, सर, काळजी करू नका. फक्त काही दिवसांची गोष्ट आहे आणि निकाल तुमच्या समोर असेल. सीआयडीची गोळी आणि बर्बोसाचं डोकं. तेव्हा एसीपी आयुष्मान म्हणतो, “तुम्ही लोक सीआयडी अधिकारी आहात की गँगस्टर?”
दरम्यान, ‘सीआयडी २’ मालिकेत एसीपी आयुष्मानची भूमिका साकारणाऱ्या पार्थ समथानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या मालिकेत तो पृथ्वी सान्यालच्या भूमिकेत दिसला होता. पण ‘कैसी ये यारियां’मधील माणिक मल्होत्राच्या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला नवीन ओळख मिळाली. यामध्ये त्याच्याबरोबर नीति टेलर दिसली होती. या मालिकेचे पाच सीझन प्रदर्शित झाले आहेत. यानंतर, पार्थ एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की २’ मध्ये अनुराग बसूच्या भूमिकेत दिसला. मग २०२४ मध्ये ‘घुडाचढी’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यात संजय दत्त, खुशाली कुमार, रवीना टंडन आणि अरुणा इराणी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.