टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनियाच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. तिचे वडील कुशल पाल सिंग यांचा ७ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचे वडील दिल्लीतील निवृत्त पोलीस अधिकारी होते. ते मुंबईतील राहत्या घरात पडले होते, दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर पवित्रा व तिचे कुटुंबीय या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत.
वडिलांच्या निधनाबद्दल ‘इ-टाइम्स’शी बोलताना पवित्रा म्हणाली, “माझे वडील अपघातानंतर गेल्या काही महिन्यांपासून बेड रेस्टवर होते. काही काळापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आणि नंतर त्यांचे निधन झाले. मला माझ्या कुटुंबियांसाठी हिंमत ठेवावी लागणार आहे. खरं तर मी सध्या काम करण्याच्या स्थितीत नाही, पण कामाच्या कमिटमेंट पूर्ण करणंही तितकंच आवश्यक आहे,” असंही तिने सांगितलं.
“माझे वडील आमच्या फ्लॅटची बाल्कनी साफ करताना खाली पडले आणि त्यानंतर त्यांना फ्रॅक्चर झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून बेड रेस्टवर होते पण त्यांची तब्येत ठीक होती. काही दिवसांपूर्वी ते पुन्हा आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक आहे. मला एक मोठा भाऊ आहे. आम्ही सगळे त्यांची खूप काळजी घेत होतो,” असं पवित्राने सांगितलं.
दरम्यान, पवित्रा पुनिया ही हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पवित्रा ‘लव्ह यू जिंदगी’, ‘बालवीर रिटर्न्स’, ‘ये है मोहोब्बतें’, ‘नागिन’, ‘कलीरें’, ‘डायन’, ‘ससुराल सिमर का’ अशा मालिकांसाठी ती ओखळली जाते.