सोनी मराठी वाहिनीवरील तुमची मुलगी काय करते या मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. या मालिकेत अभिनेता हरीष दुधाडे हा विजय भोसले या पोलिसांच्या भूमिकेत झळकला होता. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता हरीष भावूक झाला आहे.
हरीष दुधाडेने या मालिकेसाठी तसेच यातील प्रत्येक कलाकारासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने काही फोटोही शेअर केले आहेत. यावेळी तो फारच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “नवीन प्रवासाला सुरुवात…” ‘पावनखिंड’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात
हरीष दुधाडेची पोस्ट
“तुमची मुलगी काय करते”
आजवर अनेक मालिका केल्या आणि करत राहू , पण ही मालिका माझ्या आयुष्यात खास जागा करून गेली . यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे “इन्स्पॅक्टर विजय भोसले .” पोलिसांची भूमिका कराचं माझ स्वप्न पूर्ण झालं . एका वेगळ्या धाटणीचा भोसले साकारताना भूमिका उभी रहाताना लागलेले हात विसरून कसं चालेल ? सर्व प्रथम सोनी मराठी ज्यांनी माझ्यावर विश्वासठेवला , सूर्यभान नंतर अवघ्या ३ महिन्यात तुम्ही मला तयार व्हायला सांगितलं ते भोसले साठी.स्ट्रॉबेरी पिक्चरशी माझं तुमच्याशी असलेलं नातं जूनं आणि आपुलकीचं आहे त्या मुळे तुमचा फोन आणि मी विचारावं “कधिपासून ?” एवढंच काय ते संभाषण होत आपल्यात कायम…
मनवा नाईक “सरस्वती , तू सौभाग्यवती हो , शिवप्रताप , तुमची मुलगी काय करते , काळीराणी ” मला वाटतं एवढ्या नावांमधेच कळते आपली केमिस्ट्री. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभी राहिलेली एक कमाल व्यक्ती . “माणूस चांगलं असावं “अस सतत तू सांगतेस आणि तसं जगतेस . रिस्पेक्ट आणि मनापासून आभार ,या भूमिकेसाठी मला निवडलंस .
चिन्मय मांडलेकर राजे ..तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक सीनला जागण्याचा प्रयत्न मी केला , मी स्वताःला नशीबवान समजतो की एकापाठोपाठ एक दोन मालिकांमधून मी तुमच्याबरोबर काम केलं.
मुग्धा गोडबोडे रानडे तुझ्याबद्दल काय बोलू.. भोसले या पात्राला बोलतं करण्याचं काम तुझं. तुझ्या संवादांवर उभा राहिला भोसले . तुझा माझ्यावरचा विश्वास “शिरसावंद्य”. मैत्रिणतर तू आहेसच पण त्याहीपेक्षा तू कमाल माणूस आहेस .
भीमराव मुडे तू आहेस म्हणून आज भोसले दिसला. ऋणी आहे मी तुझा. कारण भोसले उभा करताना बारकावे तू मला दाखवलेस आणि माझ्याकडून करून घेतलेस .. मग तो ६ मिनिटांचा एक शॉट असो किंवा कुठलाही सीन असो. तू दिलस आणि मी ते केलं.
अमेय मोरे आणि रोहित रत्नपारखे, तुम्ही खंबीरपणे माझ्या मागे उभे राहीलात. नितीन पवार तुम्ही सगळे पदोपदी माझा हात धरून मला motivate केलत … एवढच नाही तर मी कधी खचलोच तर तुम्ही माझा हात धरून पुन्हा मला उभं केलत , त्यासाठी मनापासून आभार … पुढच्या पर्वात भेटूच , पण TMKK कायम स्मरणात राहिल तुम्हा सर्वांमुळे …तुमचाच, हरीष दुधाडे”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “माझं प्रेम दुसऱ्याचं होताना…” हरीश दुधाडेच्या लग्नानंतर अंकित मोहनची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान तुमची मुलगी काय करते या रहस्यमयी थ्रिलर मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. किल्वर कोण याचं रहस्य मालिकेच्या शेवटच्या भागात उलगडलं. अभिनेत्री मनवा नाईकने या मालिकेची निर्मिती केली होती. याच मालिकेच्या माध्यमातून इन्स्पेक्टर भोसले आणि PSI जमदाडे या दोन व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या. याच दोन व्यक्तिरेखा सोनी मराठीवर सुरु होणाऱ्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
अभिनेत्री मनवा नाईक पुन्हा एकदा मालिकेच्या निमित्ताने निर्माती म्हणून धुरा सांभाळणार आहे. चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा या नव्या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी सांभाळणार आहे. या मालिकेचे नाव काय असणार याबद्दल मात्र गुप्तता पाळली जात आहे.