काही दिवसांपूर्वी घडलेल्या श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला प्रकरणाने संपूर्ण देशाची झोप उडवली होती. क्रूरतेच्या सगळ्या सीमा ओलांडून आफताबने जे कृत्य केलं त्यातून लोक अजून सावरलेही नाहीत त्यात आता सोनी टेलिव्हिजनच्या ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकेने यात वेगळीच भर घातली आहे. नुकतच ‘क्राइम पेट्रोल २.०’ या नव्या सीझनमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडावर बेतलेला एक एपिसोड दाखवण्यात आला.
सोनी टेलिव्हिजनवरील या मालिकतील भाग जरी सत्यघटनेपासून प्रेरित असले तरी त्यात काही काल्पनिक गोष्टीदेखील दाखवण्यात येतात, एकूणच हे एक नाट्यमय रूपांतरण असतं. या नव्या एपिसोडमध्ये हेच नाटकीय रूपांतरण प्रेक्षकांना प्रचंड खटकलं आहे. या एपिसोडमधील मुख्य पात्रांची नावं बदलल्यामुळे चांगलाच गहजब झाला आहे.
हा एपिसोड त्याच प्रकरणावर बेतलेला आहे असं कुठेही लिहिलेलं नसलं तरी प्रेक्षकांना त्यातील संदर्भ लगेच समजले आणि यातील मुख्य भूमिका सकारणाऱ्या लोकांचा धर्म बदलल्याने ते आणखीनच खवळले. या एपिसोडमध्ये मुलीचे नाव एना फर्नांडिस म्हणजेच ख्रिश्चन केलं असून मुलाचं नाव मिहिर म्हणजेच हिंदू नाव ठेवल्याचं प्रेक्षकांनी चटकन ओळखलं. ही समजताच लोकांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली. ‘अहमदाबाद पुणे मर्डर’ या टायटल खाली हा एपिसोड २७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसारित करण्यात आला होता.
सोशल मीडियावर याचे चांगलेच पडसाद उमटू लागले. लोकांनी यातील व्हिडिओ क्लिप्स शेअर करत याचे संदर्भ लावले आणि ‘सोनी टेलिव्हिजन’ या चॅनलचा निषेध केला आहे. तथ्यांची मोडतोड करून दाखवलं गेलेलं कथानक लोकांच्या अजिबात पचनी पडलेलं नाही. सोशल मीडियावर सध्या ‘बॉयकॉट सोनी टीव्ही’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांचा रोष बघता सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरूनही तो एपिसोड हटवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.