‘शार्क टँक इंडिया’ हा कार्यक्रम त्याच्या तिसऱ्या सीझनमुळे पुन्हा चर्चेत आहे. सोमवार २२ जानेवारी २०२४ पासून हा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. आत्तापर्यंत या सीझनचे बरेच भाग प्रदर्शित झाले आहेत. या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच या सीझनचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. तिसऱ्या सीझनमध्येसुद्धा प्रेक्षकांना नवीन उद्योजक शार्कच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
‘शार्क टँक इंडिया’मध्ये नवनवे फाऊंडर्स त्यांच्या व्यवसायासाठी फंडिंग गोळा करण्यासाठी येतात, पण नुकत्याच आलेल्या एपिसोडमध्ये एका शार्कने थेट समोरच्या उद्योजकाची कंपनी विकत घ्यायचाच प्रस्ताव समोर ठेवला. ‘ब्युटी जीपीटी’ हे प्रॉडक्ट विकणाऱ्या ‘ऑरबो एआय’ ही कंपनी विकत घ्यायचा थेट प्रस्तावच ‘लेन्सकार्ट’चे सीईओ आणि शार्क पीयूष बन्सल यांनी ठेवला. ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासात घडलेली ही पहिलीच घटना ठरली जिथे फंडिंग घ्यायला आलेल्या कंपनीलाच विकत घ्यायचा प्रस्ताव मांडला गेला.
‘ऑरबो एआय’ ला ‘शुगर कॉस्मेटिक’ची सीइओ विनीता सिंग हिने १ कोटी रुपयांत १% मालकीसाठी ऑफर दिली. एकूणच या प्रॉडक्ट आणि कंपनीला आणखी चांगल्या मार्गावर आणण्यासाठी पीयूष बन्सलनेदेखील या कंपनीच्या फाऊंडर्सना एक वेगळीच ऑफर दिली. पीयूषने ही कंपनी विकत घ्यायचाच प्रस्ताव समोर ठेवत १५ कोटींमध्ये ५४% कंपनीची मालकी विकत घ्यायची ऑफर समोर ठेवली. पीयूषची ही ऑफर ऐकून इतरही शार्क चांगलेच आश्चर्यचकित झाले.
‘बोट’ कंपनीचा सीईओ अमन गुप्ता यांनी पीयूषची ऑफर सर्वात वाईट ऑफर असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर अशाप्रकारे १० मिनिटांत कंपनी विकण्याची चूक करू नका अशी विनंतीही त्याने कंपनीच्या मूळ फाऊंडर्सना केली. “हा शार्क टँक इंडिया आहे की लेन्सकार्ट टँक आहे?” असा खोचक टोमणाही अमनने पीयूषला मारला. अखेर बराच विचार केल्यानंतर कंपनीच्या फाऊंडर्सनीदेखील पीयूषच्या ऑफर ऐवजी विनीताची ऑफर स्वीकारली. ‘शार्क टँक इंडिया’ या शो तुम्ही सोनी टेलिव्हिजन आणि सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.