‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिकांचा लवकरच महासंगम पाहायला मिळणार आहे. ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. यानिमित्ताने अशोक मामा आणि पिंगा गर्ल्सची भेट होणार आहे. या भेटीदरम्यान काय-काय घडणार आहे? हे २४ मार्चला पाहायला मिळणार आहे. दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या महासंगम प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील कलाकारांना अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांच्याबरोबरचा काम करण्याचा अनुभव सांगत आहेत.

‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील वल्लरीचा नवरा मनोज म्हणजेच अभिनेता स्वप्नील काळेने नुकतीच अशोक सराफ यांच्यासंदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे. अशोक यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत स्वप्नीलने लिहिलं आहे की, आयुष्यातला सर्वात खास क्षण…मामांनी खांद्यावर हात ठेवला. आता ‘आपण कोणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगा..डा! आपण कोणालाच नाही घाबरत. पण मामा, मला फोटो हवा म्हणून तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा माझं शुंतुनू, परशुराम असं सगळंच झालं. तुमच्या भाषेत व्याख्या विक्खी वोक्खो झालं. ( मला माहितीये तुम्ही सगळ्यांनी हे त्याच चालीत आणि लयीत वाचलं )

पुढे स्वप्नील काळेने लिहिलं, “इतकी वर्षं तुम्हाला पाहून आणि आता तुमच्याबरोबर काम करून खूप काही शिकलो आणि यापुढेही शिकत राहू. दोन दिवस आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही गोपुकाकासारखं सांभाळून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद. हा योग जुळवून आणल्याबद्दल कलर्स मराठी, कान्हा मॅजिक प्रोडक्शन बोधित्री मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे खूप खूप आभार.”

दरम्यान, स्वप्नील काळेच्या या पोस्टवर बऱ्याच चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मस्त लिहिलंय”, “हाहाहा…अगदी तसंच वाचलं”, “खूप छान यार”, “लयभारी”, “वाह…तू खूप नशीबवान आहेस”, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहे. स्वप्नीलच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Story img Loader