कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga) मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पिंगा गर्ल्सची हटके आणि अनोखी मैत्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. ज्याप्रकारे त्या एकमेकींची साथ देत आहेत आणि काळजी घेत आहेत, हे बघून त्यांच्यातील मैत्रीचे आणखी नवे रंग पाहायला मिळणार आहेत. पण, अशातच आता मालिकेत एका आनंदाच्या क्षणाचं रूपांतर एका अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेत होणार आहे.
मिथूच्या सरप्राइझची वाट पाहत असलेल्या पिंगा गर्ल्सना एक मोठा धक्का बसणार आहे. तेजा आणि हर्षितसाठी खास सरप्राईज प्लॅन करणारी मिथू घरात गंभीर अवस्थेत आढळणार आहे. तेजा हाक मारण्यासाठी आत जाताच तिच्या किंकाळीनं पिंगा गर्ल्सचं घरं हादरणार आहे. मालिकेतील या आगामी नवीन कथानकाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये तेजा दरवाजा उघडते तेव्हा मिथू जखमी अवस्थेत असलेली दिसते. तिच्या पोटावर रक्त पाहायला मिळत आहे. मिथूला या अशा अवस्थेत पाहून पिंगा गर्ल्सना मोठा धक्का बसतो. मिथूबरोबरच्या प्रसंगामुळे पाचही जणी हादरल्याचे यात दिसत आहे. या घटनेचा शोध घेण्यासाठी पोलिसही प्रयत्न करतानाचे या प्रोमोमध्ये दिसत आहे.
तसंच मिथूबरोबर झालेल्या या घटनेमागे नेमकी कोणती पार्श्वभूमी आहे, याचा शोध घेण्याचं आव्हान आता पिंगा गर्ल्ससमोर उभं राहिलं आहे. या घटनेनंतर श्वेता आणि तेजा खचल्या असून प्रेरणा आणि वल्लरी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आता या घटनेनंतर पिंगा गर्ल्सच्या मैत्रीत आणि मालिकेच्या कथानकात काय नवं वळण येणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तसंच मिथूवरील हल्ल्यामुळे पिंगा गर्ल्सची मैत्री अजून घट्ट होईल का की त्यांच्यातील दुरावा आणखीनच वाढेल? तसंच याप्रकरणी पोलिसांच्या हाती कोणती माहिती लागणार? मिथूवर हल्ला नेमका कुणी केला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागातून पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, पाच मैत्रिणींच्या मैत्रीवर आधारित ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि विदीशा म्हसकर या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यातील खास केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच या घटनेमुळे या पाच मैत्रिणींचे आयुष्य कसं बदलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.