अभिनेत्री शिवानी बावकर व अभिनेता आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ ही नवीन मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत शिवानी व आकाश यांच्यासह अभिनेत्री सुप्रिया पाठारे, प्रशांत चौडप्पा, पंढरीनाथ कांबळे असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. आता यात आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे.
‘साधी माणसं’ या मालिकेत शिवानी म्हणजे मीरा ही फुलविक्रेती दाखवण्यात आली आहे. तर आकाश म्हणजे सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचे भिन्न स्वभाव आहेत. सुरुवातीपासून दोघांमध्ये वाद होताना दिसत आहेत. पण या वादाचे रुपांतर प्रेमात कसं होणार? मीरा व सत्या एकत्र कसे येणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या अडारकर हिची एन्ट्री झाली आहे.
हेही वाचा – कार्तिकी गायकवाडला होणाऱ्या बाळाकडून आहे ‘ही’ अपेक्षा, म्हणाली, “मुलगा होणार की मुलगी यापेक्षा…”
ऐश्वर्या अडारकर ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत मितालीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. आता तिने ‘साधी माणसं’ या मालिकेत पंकजची गर्लफ्रेंड सारिका ही भूमिका साकारली आहे. या मालिकेतील तिच्या एन्ट्रीचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या अडारकर ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटात पाहायला मिळाली होती. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.