मराठी सिने आणि नाट्य सृष्टीत अत्यंत अदबीनं ज्याचं नाव घेतलं जातं ते म्हणजे अशोक सराफ. प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असणारे अशोक सराफ गेल्या ४ दशकांपासून मनोरंजन करत आहेत. कधी विनोदी, कधी गंभीर, तर कधी खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारून मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाले आहेत. नुकतेच अशोक सराफ त्यांना आवडणाऱ्या मालिकेतील कलाकारांना भेटले; ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मराठी मालिकाविश्वात अनेक मालिका सध्या सुरू आहेत. काही महिन्यांपासून नव्या मालिका देखील सामिल झाल्या आहे. याच मराठी मालिकांमधील एक मालिका अशोक सराफ न चुकता पाहतात. या मालिकेतील कलाकारांशी त्यांची नुकतीच खास भेट झाली. अशोक सराफ यांना आवडणारी ही मराठी मालिका नेमकी कोणती? जाणून घ्या…
अशोक सराफ न चुकता पाहत असलेली ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका दुसरी, तिसरी कोणती नसून ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेत झळकलेले अभिनेता इंद्रनील कामत व अभिनेत्री रसिका वाखरकर यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गप्पा तर रंगल्याचं, पण मालिकेचा एक भाग देखील एकत्र पाहिला. या खास भेटीचे फोटो रसिका वाखरकरने शेअर करून पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री रसिका वाखरकरने लिहिलं आहे की, “मी कधीच मालिका पाहत नाही.. पण तुमची मालिका मी न चुकता रोज बघतो – अशोक सराफ…बसं काय हवंय अजून? काल त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्याबरोबर आमच्या मालिकेचा भाग बघण्याचा योग आला…अविस्मरणीय दिवस! निवेदिता ताई मनःपूर्वक आभार आणि हे सगळं घडवून आणल्याबद्दल प्रिय तेजश्री प्रधान तुझेही आभार.”
रसिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “जिंकलंस”, “ग्रेट रसिका”, “आम्ही पण रोज मालिका पाहतो”, “व्वा”, “तुम्ही दोघं नशीबवान आहे”, “एकदम शॉल्लेट”, “भारी”, “किती मस्त”, “अभिनंदन”, अशा अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.