केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. २५ एप्रिल २०२५ला प्रदर्शित होणाऱ्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटांचं नुकतंच चित्रीकरण पूर्ण झालं. यानिमित्ताने केदार शिंदेंसह चित्रपटातील कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. ‘झापुक झुपूक’ चित्रपटात लोकप्रिय मालिका ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील अभिनेता झळकणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित केदार शिंदेंचे आभार मानले आहेत.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिका चांगली गाजली होती. जानेवारी २०२३मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेतील सावी आणि अर्जुनची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. अभिनेता इंद्रनील कामतने अर्जुन आणि अभिनेत्री रसिका वाखरकरने सावी ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. ही मलिका संपल्यानंतर रसिका ‘अशोक मा.मा’ मालिकेत पाहायला मिळत आहे. तसंच आता इंद्रनील ‘झापुक झुपूक’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानिमित्ताने इंद्रनीलने खास पोस्ट शेअर केली आहे.
इंद्रनील कामतने केदार शिंदेंना मिठी मारताना फोटो शेअर करत लिहिलं आहे, “थेंब आणिक सागराचे नाते मज पामर कळले…मी ही सागरात मिसळलो, सागर माझ्यात मावला!…चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं पण हा प्रवास कायम माझ्याबरोबर राहिल. ‘झापुक झुपुक’ चित्रपट माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे आणि केदार सरांचं मार्गदर्शन, दूरदृष्टी आणि माझ्यावरील विश्वास यासाठी मी त्यांचे आभार मानू शकत नाही. २५ एप्रिल २०२५ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तुम्ही सर्वजण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहात. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्याबरोबर असेच राहू द्या.”
दरम्यान, ‘झापुकू झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाण, इंद्रनील कामतसह हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. त्यामुळे आता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.