‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिका चांगली गाजली होती. जानेवारी २०२३मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. दीड वर्ष ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेने अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील सावी आणि अर्जुनची जोडी खूप लोकप्रिय झाली.
अभिनेता इंद्रनील कामतने अर्जुन आणि अभिनेत्री रसिका वाखरकरने सावी ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारल्यामुळे प्रेक्षकांनी दोघांना डोक्यावर घेतलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. मालिका संपून काही महिने झाले असूनही मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. नुकतीच इंद्रनील कामत आणि तेजश्री प्रधानची ग्रेट भेट झाली. याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून तेजश्री प्रधान कधी नाटकाचा आस्वाद घेताना तर कधी ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. नुकतीच तिने इंद्रनील कामतची भेट घेतली. याचा फोटो इंद्रनीलने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं की, राहूल, जावा जीप…विचारमंथन आणि बरंच काही… तेजश्री, तू खूप दयाळू आहेस. या दिवसासाठी हे खास गाणं. इंद्रनीलची हीच स्टोरी तेजश्रीने शेअर करत हसण्याचे इमोजी त्यावर पोस्ट करत लिहिलं आहे की, पहिला शब्द…दोघांच्या या भेटीचा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान, इंद्रनील कामतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’नंतर लवकरच तो नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात इंद्रनील झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो शेअर करत इंद्रनीलने ही आनंदाची बातमी दिली होती. तसंच तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाला अजूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ती आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.