प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. फ्री प्रेस जर्नलने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं होतं.
शिवाय तुनिषाच्या घरच्यांनीही शिझान खानवर आरोप केले आहेत. यावर आता पोलिसांनी केलेला खुलासा समोर आला आहे. रात्रीच तुनिषाच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं आहे, त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नसला तरी पोलिसांनी हातात असलेल्या माहितीवरून तुनिषाच्या गरोदर असण्याबद्दल माहिती दिली आहे.
‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार नवीन अपडेटमध्ये पोलिसांनी तुनिषाच्या गरोदर असण्याची बाब खोडून काढली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या प्राथमिक माहितीनुसार ती गरोदर नसल्याचं समोर आलं आहे. तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नसून गळफास लावल्यावर श्वास घेण्यास त्रास झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
एवढंच नाही तर गेल्या २४ तासांत तुनिषा फोनवर किंवा सेटवर कोणाकोणाशी बोलली त्या सगळ्यांचे जबाब नोंदवले जात असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सध्या सब टीव्ही मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये तुनिशा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव्ह’ ही मालिका लोकांना खूप आवडली होती.