‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २० दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. तो २२ एप्रिलला घरातून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता, पण तो विमानतळावर गेलाच नाही. माघारी घरी न आल्याने २६ एप्रिलला अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. दिल्ली पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत, पण तो नेमका कुठे आहे, याबाबत काहीच माहिती हाती आलेली नाही. अशातच पोलीस तपासात काही संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत.

गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती नवे अपडेट्स आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग २७ ईमेल वापरत होता. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या तपासात पोलिसांना अनेक पुरावे मिळाले आहेत. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, गुरुचरणला वाटत होतं की कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. अभिनेत्याला कशाची तरी भीती होती, म्हणूनच तो तब्बल २७ वेगवेगळे ईमेल वापरत होता.

१० हून जास्त बँक खाती, क्रेडिट कार्डचा ‘असा’ वापर अन्…; बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल नवीन माहिती आली समोर

तपासाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्याला संशय होता की कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, म्हणूनच तो इतके ईमेल व १० पेक्षा जास्त बँक खाती वापरत होता. एवढंच नाही तर गुरुचरण सिंग दोन फोन वापरत होता. पण त्यापैकी एक फोन त्याने घरीच ठेवला तर एक फोन त्याच्या जवळ होता. त्याचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता त्याचा शेवटचा कॉल त्याने मुंबईतील एका मित्राला केला होता, तो मित्र त्याला घ्यायला येणार होता.

या आठवड्यात OTT वर आलेत जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वीकेंड मनोरंजक करण्यासाठी वाचा कलाकृतींची यादी

‘इकोनॉमिक टाइम्स’ च्या वृत्तानुसार, पोलिसांनी गुरुचरण सिंगची बँक खाती आणि क्रेडिट कार्ड या दोन्हींवरून त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढली आहे. त्यानुसार, तो गायब झाला त्या दिवशी त्याच्या एका बँक खात्यातून १४ हजार रुपये काढले होते. त्याच्यावर थकित बँक कर्ज पाहता त्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, असं दिसून येतंय, असंही पोलिसांनी सांगितलं.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

दिल्लीतील क्राइम ब्रँच आणि स्पेशल सेलसह पोलिसांची अनेक पथकं गुरुचरणचा शोध घेत आहेत, असंही पोलिसांनी म्हटलंय. अभिनेता एका विशिष्ट पंथाशी संबंधित दिल्लीतील छत्तरपूर येथील ध्यान केंद्रात वारंवार जात होता. याठिकाणावरील काही अनुयायांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. त्यानुसार, गुरुचरणने ध्यानासाठी हिमालयात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. दिल्ली पोलिसांच्या पथकांनी दिल्ली आणि मुंबईतील ५० हून अधिक लोकांचे जबाब घेतले आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी अभिनेत्याचा शोध घेण्यासाठी हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांना भेटी दिल्या आहेत.