अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वाच्या आगामी भागात अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहेत. अभिजीत बिचुकले यांनी काही वर्षांपूर्वी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. आता त्यांनी आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या विरुद्ध लढवलेल्या निवडणुकीबद्दल भाष्य केलं.
‘खुपते तिथे गुप्ते’च्या या पर्वामध्ये आतापर्यंत आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या नेते मंडळींनी हजेरी लावली. तर आता राजकारणी अभिजीत बिचुकले या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. आता या आगामी भागाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात ते आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध त्यांनी लढवलेल्या निवडणुकीबद्दक भाष्य करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “उद्धव ठाकरे राजकारणी वाटतच नाहीत…”, अभिजीत बिचुकलेंनी मांडलं मत, म्हणाले, “मला ते…”
“अभिजीत बिचुकले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्याचबरोबर अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या पक्षातून फॉर्म भरले. अभिजीत बिचुकले यांना जिंकायचं नसतं तर फक्त चर्चेत राहायचं असतं असं लोक म्हणतात,” असं अवधूत गुप्ते म्हणाल्यावर अभिजीत बिचुकले म्हणाले, “मला जर चर्चेत राहायचं असेल तर तुम्ही जा, तुम्ही चर्चेत राहा. तुमच्यात काही दम नाही का? उद्धव दादांचे आणि माझे चांगले संबंध आहेत म्हणून…”
त्यावर अवधूतने त्यांना विचारलं की, “उद्धव ठाकरे आणि तुमचे चांगले संबंध असूनही तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणुकीला का उभे राहिलात?” त्यावर अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, “मी लोकशाहीने गेलो. मी त्यांचा मिंदा नाही. गंमत अशी झाली की काही अंशी त्या ठिकाणी माझ्यामुळे आदित्यचं जास्त नाव झालं.”
हेही वाचा : “किती वाईट दिवस आलेत गुप्तेवर…”, ‘खुपते तिथे गुप्ते’वर प्रेक्षक नाराज, अवधूतला ट्रोल करत म्हणाले…
दरम्यान, या आगामी भागाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या आगामी भागाच्या प्रोमोंना संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी अभिजीत बिचुकले यांना या मंचावर बोलावल्यामुळे कार्यक्रमाला आणि अवधूत गुप्तेला ट्रोल केलं. तर काहींनी हा भाग पाहण्यासारखा असेल अशा प्रतिक्रिया दिल्या.