बॉलीवूडमध्ये १९९० च्या दशकात गोविंदा हा त्याच्या विनोदासाठी आणि डान्ससाठी प्रसिद्ध होता. मात्र, अनेकांना गोविंदाच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमागे कोरिओग्राफर गणेश आचार्य हे होते हे माहीत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी एका मुलाखतीदरम्यान, त्यांना पहिल्यांदा गोविंदासोबत कधी काम करण्याची संधी मिळाली, गोविंदाला भेटण्यासाठी त्यांनी काय केले, हे सांगितले आहे.

काय म्हणाले गणेश आचार्य?

गणेश आचार्य यांनी ‘फ्रायडे टॉकीज’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ते सांगतात, “मी कोरिओग्राफ केलेल्या काही गाण्यांना यश मिळत होते. त्यावेळी माझ्या बहिणीने मला सांगितले की, माझी जी डान्सची स्टाईल आहे, ती गोविंदाच्या ऑनस्क्रीन व्यक्तीरेखेबरोबर चांगली सूट होईल. त्यानंतर मी गोविंदाला भेटण्याचे ठरवले, पण एकप्रकारे ती माझी परीक्षाच होती. कारण गोविंदा त्या काळातला मोठा प्रसिद्ध अभिनेता होता.

हेही वाचा: “५ महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!” विकी कौशलला सॅम मानेकशॉ यांच्या मुलीने केला मेसेज; अभिनेता म्हणाला…

गोविंदाला भेटण्यासाठी मी त्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर जाऊन उभा राहायचो. अभिनेत्याला भेटण्याआधी असे मी सहा महिने केले होते. खूप वाट बघितल्यानंतर गोविंदाने मला त्याच्या ‘प्रेम शक्ती’ या चित्रपटातील गाण्यांना कोरिओग्राफ करण्याची संधी दिली. त्याने मला फक्त दोन दिवस दिले. महत्त्वाचे म्हणजे या दोन दिवसांत गोविंदा दरदिवशी एक तास म्हणजे दोन दिवसात दोन तास भेटला. मी त्या दोन तासात त्या गाण्यांच्या स्टेप बसवल्या. यामुळे गोविंदा माझ्यावर खूश झाला आणि त्याने डेव्हिड धवनला बोलवत मला त्यानंतर मोठी संधी दिली.

मला ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातील ‘तुम तो धोकेबाज हो’ हे गाणे दिले. या गाण्यामुळे ते खूप आनंदात होते. गणेश आचार्य म्हणाले, त्यानंतर गोविंदा आणि डेव्हिड धवन यांनी मला त्यांच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटातील ‘हुस्न हे सुहाना’ हे गाणे दिले. “

या गाण्याची आठवण सांगताना गणेश आचार्य यांनी सांगितले, त्यावेळी सरोज खान आणि चिन्नी प्रकाश हे अग्रगण्य कोरिओग्राफर होते. चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी यांना त्यांच्याकडून हे गाणे कोरिओग्राफ करायचे होते आणि डेव्हिड धवन व गोविंदा यांना माझ्याकडून हे गाणे करून घ्यायचे होते.

जेव्हा जेव्हा रमेश तौरानी हे सरोज खान यांच्याबरोबरच्या तारखा ठरवायचे त्यावेळी डेव्हिड धवन आणि गोविंदा त्यावेळात हजर राहू शकत नसल्याचे सांगायचे. चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ जवळ आली आणि या दोघांना समजले की सरोज खान व चिन्नी प्रकाश सध्या दुसरीकडे व्यस्त आहेत. त्यावेळी रमेश तौरानी यांनी विचारले, आता हे गाणे कोण करणार, त्यावेळी गोविंदा आणि डेव्हिड धवन यांनी माझे नाव सुचवले आणि ते गाणे शूट झाले; अशी आठवण गणेश आचार्य यांनी सांगितली आहे.

दरम्यान, ‘हुस्न है सुहाना’ हे गाणे गोविंदाच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular coreographer ganesh aacharya recalled his first meeting with govinda nsp