अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदे(Utkarsh Shinde) हा त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वक्तव्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर भाष्य करताना दिसतो, त्यामुळे त्याची मोठी चर्चा होताना दिसते. तो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातदेखील सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने त्याच्या खेळाने सर्वांचे मन जिंकले होते. आता त्याने एका मुलाखतीत रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणारे गायक पुन्हा काम करताना का दिसत नाहीत, यावर वक्तव्य केले आहे.

मला प्रसिद्धी मिळाली…

उत्कर्ष शिंदेने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. रिअ‍ॅलिटी शोमधील जो गायक जिंकतो किंवा जे गायक शोमध्ये दिसतात, ते पुन्हा प्ले बॅकसाठी गाताना खूप क्वचित दिसतात. यावर बोलताना उत्कर्ष शिंदे म्हणाला, “मला असं वाटतं काही जणांना असं वाटत असेल की मी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसलो किंवा जिंकलो तर माझ्यासाठी पुढे सोपा मार्ग आहे, त्यामुळे त्यांची संघर्ष करण्याची जिद्द कमी होत असेल. त्यांना वाटत असेल की आता मला प्रसिद्धी मिळाली, मला स्टारडम मिळालं, अशा अविर्भावामध्ये बरेच लोक खूश होतात. शिंदे कुटुंब म्हणून आम्ही पिढ्यानपिढ्या यावर विश्वास ठेवतो की जोपर्यंत तुम्ही स्वत:ला नेहमी सिद्ध कराल, तोपर्यंत प्रसिद्ध व्हाल. मला वाटतं हे सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. आपण कुठपर्यंत पोहोचलोय किंवा मला आज काय मिळालंय यापेक्षा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, त्याची तयारी कधी सोडू नये. आपण काही पुरस्कार जिंकलो किंवा नाही जिंकलो तर काही फरक पडत नाही. पण, आपल्याला खूप काही जिंकायचं आहे; यासाठी रोज नव्याने तयारी केली तरच आपल्याला जे हवं ते आपण गाठू शकतो”, असे म्हणत उत्कर्ष शिंदेने त्याचे मत मांडले आहे.

टेलिव्हिजनवर अनेक रिअ‍ॅलिटी शो पाहायला मिळतात. काही शो नृत्यावर आधारित असतात, काही अभिनयाशी निगडीत असतात; तर काही शो गाण्यांवर आधारित असतात. बिग बॉस, रोडिज, स्पिल्टव्हिला, खतरों के खिलाडी, इंडियन आयडल असे अनेक रिअॅलिटी शो प्रसिद्ध असल्याचे पाहायला मिळते. या कार्यक्रमांची लोकप्रियता मोठी आहे.

उत्कर्ष शिंदे हा त्याच्या गाण्यामुळे, अभिनयामुळे मोठ्या चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर तो अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर करीत असतो. काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन जाळपोळ झाल्याची घटना घडली, त्यावेळी त्याने कविता लिहीत नागरिकांना शांतता-संयम राखण्याचं आवाहन केले होते. आता गायक कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.