मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेले कित्येक महिने आंदोलन चालू होतं. मनोज जरांगे पाटलांसह राज्यभरातील मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आले होते. काही महिन्यांआधी जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी येथून उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या उपोषणाचं रुपांतर भव्य आंदोलनात झालं. अखेर आता सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. सध्या राज्यभरात मराठा समाजामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वत्र गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून विजय साजरा केला जात आहे. यावर आता मनोरंजनसृष्टीत कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळाल्यावर अश्विनी महांगडे, किरण माने यांच्या पाठोपाठ आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच” या पोस्टबरोबर तिने मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या पोस्टवर प्राजक्ताने “मराठा, ९६कुळी मराठा, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील, मराठा आरक्षण, मराठा साम्राज्य, अभिमान, नाद, स्वराज्य” असे हॅशटॅग दिले आहेत.
हेही वाचा : “अतिशय गलिच्छ राजकारण”, किरण मानेंनी मांडलं स्पष्ट मत; उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले, “साथीदार सोडून गेल्यावर…”
दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी “इतिहास उलटून पाहाल तर विजय नेहमी आमच्याबरोबर होता आहे राहील”, “आपल्यासाठी या महिन्यात दोन वेळा दिवाळी आली.. एक राम मंदिराची आणि एक आरक्षणाची…”, “लढलो आणि जिंकलो” अशा विविध प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटलांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच त्यांना या लढ्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.