Prajakta Mali & Swapnil Joshi : सोनाली कुलकर्णी व स्वप्नील जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुशीला सुजीत’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. यामधलं ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ हे गाणं सुद्धा सर्वत्र ट्रेंड होत आहे. या गाण्यावर सध्या अनेक सेलिब्रिटी थिरकताना दिसत आहेत.

‘चिऊताई चिऊताई दार उघड’ या मूळ गाण्यात अमृता खानविलकर व गश्मीर महाजनी यांची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळते. या गाण्यात दोघांनी भन्नाट डान्स केला आहे. डान्सच्या स्टेप्स, वेशभूषा, अमृताचे हटके कानातले या गोष्टींची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली होती.

आता या गाण्यावर एक खास जोडी थिरकली आहे. सध्या ‘सुशीला सुजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामधले प्रमुख कलाकार विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. या सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओक असल्याने नुकतीच ‘सुशीला सुजीत’च्या संपूर्ण टीमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर सिनेमाचा प्रमुख अभिनेता स्वप्नील जोशी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघांनी मिळून ‘सुशीला सुजीत’मधील ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

प्राजक्ता लिहिते, “मला माहिती आहे की, मी ‘चिऊताई reel स्पर्धेचे’ सगळे नियम मोडलेत. पण हा व्हिडीओ स्पर्धेसाठी नाही, शुभेच्छांसाठी आहेत. सहकलाकार जे या चित्रपटाद्वारे निर्माते होतायेत; त्यांना मनापासून आभाळभर शुभेच्छा” हा सिनेमा येत्या १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

दरम्यान, प्राजक्ता माळी आणि स्वप्नील जोशीच्या डान्स व्हिडीओवर अमृता खानविलकरने कमेंट करत “हाय….क्युटेस्ट” असं म्हटलं आहे. याशिवाय प्रसाद ओक, मंजिरी ओक यांच्यासह चाहत्यांनी कमेंट्स करत प्राजक्ता व स्वप्नीलच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, ‘सुशीला- सुजीत’मध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपटाची कथा व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद ओकने सांभाळली आहे. तर, चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्नील जोशी असे पाच जण मिळून करणार आहेत. प्रेक्षक सुद्धा ही आगळीवेगळी कथा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.