बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असा ‘नाच गं घुमा’ चित्रपट आज (१ मे) प्रदर्शित झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर प्रदर्शनाचा दिवस आला आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर गाणी ट्रेंड होतं आहेत. त्यामुळे आता ‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते, सारंग साठ्ये असे तगडे कलाकार मंडळी झळकले आहेत. सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची टीम प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. नुकतंच प्रमोशनासाठी या चित्रपटाची टीम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या मोनेंसह चित्रपटातील बरेच कलाकार उपस्थित होते. या कलाकारांबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अभिनेत्री ‘नाच गं घुमा’ गाण्यावर जबरदस्त थिरकल्या. याचा व्हिडीओ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अमित फाळके यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आपल्या घुमा थिरकल्या,” असं कॅप्शन लिहित अमित यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला प्राजक्ता माळी व नम्रता संभेराव ‘नाच गं घुमा’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व अभिनेत्री आणि ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची टीम दोघींना साथ देऊन जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा – Video: अविनाश नारकरांचा नेटकऱ्यांना खटकला डान्स, ऐश्वर्या नारकर स्पष्टच म्हणाल्या, “तो…”
दरम्यान, याआधीही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अभिनेत्रींनी ‘नाच गं घुमा’ गाण्यावर डान्स केला होता. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत नम्रतासह वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, चेतना भट्ट, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, ईशा डे या सर्व अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला होता.