‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे होस्टिंग करीत प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali) होय. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत अभिनेत्रीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच प्राजक्ता माळी फिटनेससाठीदेखील ओळखली जाते. आता एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने तिच्या वजनाच्या बाबतीत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

प्राजक्ता माळी म्हणाली…

प्राजक्ता माळीने नुकताच ‘सकाळ प्रीमियरशी’ संवाद साधला. यावेळी तिला प्राजक्ता माळी फूडी आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना प्राजक्ता माळीने म्हटले, “मी प्रचंड फूडी आहे. मी जर अभिनेत्री नसते, तर माझं वजन ७० किलो असतं. खाण्यावर माझं प्रेम आहे. हल्ली मला एक साक्षात्कार झाला आहे. आधीसुद्धा एकदा झाला होता; पण तो मी फार मनावर घेतला नव्हता. आपल्याला जगण्यासाठी खूप कमी अन्न लागतं. एका वेळी आपण जेवढी आपली मूठ आहे, तेवढंच अन्न खायला पाहिजे. आपण अति प्रमाणात खातो. म्हणून आपल्या शरीरातील अवयवांवर दबाव येतो. त्यामुळे मी अजूनही फूडी आहे; मात्र मी अन्न खाण्याचं प्रमाण कमी केलं आहे. एका वेळी मी दोन पोळ्या खात नाही; पाऊण वगैरे खाते. दोन मोदकांमध्ये माझं रात्रीचं जेवण संपतं. रात्री कमी खाते. दुपारचं जेवण जास्त करते.”

याच मुलाखतीत प्राजक्ताने असेही म्हटले, “शूटिंग सुरू असताना शॉट लागला, तर साडेदहा वाजून गेले तरी तुम्हाला कधी कधी नाश्ता मिळत नाही किंवा लेट पॅकअप झालं तरी वेळेत झोपणं होत नाही. तो बेशिस्तपणा एक कलाकार म्हणून मी अंगी बाणवला आहे. पण, मी पोलिसांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून असल्यामुळे आणि मी भरतनाट्यम डान्सर असल्यामुळे मला शिस्त लागलेली आहे. बाकींच्या तुलनेत मी कमी बेशिस्त आहे. तर काही गोष्टींमुळे इतर गोष्टी झाल्या नसतील, तर त्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करते. चार दिवस व्यायाम नसेल झाला, तर पुढचे चार दिवस सलग व्यायाम करते. त्यामुळे मी ट्रॅक सोडला तरी मला ट्रॅकवर यायला कमी वेळ लागतो, पटकन येते.”

अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. त्यासह तिने तिच्या वजनाच्या बाबतीत एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने म्हटले होते, “कधी नव्हे, ते कष्ट न घेता छान कॉलरबोन्स दिसायला लागलेत. कधी नव्हे, ती जॉलाइन यायला लागली आहे. कधी नव्हे, ते गालावरचं बाळसं उतरलं आहे. आजूबाजूचे म्हणायला लागलेत की, एवढी बारीक होऊ नकोस आणि मला तर वजन ५० करायचंय. आता ५१ किलो वजन आहे”, अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा: पुन्हा एकदा सिंघम अगेन vs भूल भुलैया 3; दोन्ही चित्रपट एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा

दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयाबरोबरच, तिच्या फिटनेस, नृत्यासाठीदेखील ओळखली जाते. अभिनयाबरोबर आता प्राजक्ता माळी निर्माती म्हणूनदेखील समोर आली आहे. फुलवंती या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसली. तिच्याबरोबर गश्मीर महाजनी होता. या चित्रपटाची निर्माती म्हणूनदेखील तिने जबाबदारी पार पाडली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत प्राजक्ताने विविध धाटणीच्या भूमिका कऱण्याची इच्छा व्यक्त केली. २०२५ मध्ये विविध प्रोजेक्ट मिळावेत, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

Story img Loader