Zee Chitra Gaurav Puraskar 2025 : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार नुकताच पार पडला. दरवर्षी या सोहळ्यात मराठी कलाविश्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रपटांचा तसेच कलाकारांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी पुरस्काराच्या शर्यतीत ‘फुलवंती’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘नाच गं घुमा’ हे सिनेमे होते. हा सोहळा टिव्हीवर प्रदर्शित झाल्यावर सगळ्या विजेत्यांची यादी प्रेक्षकांसमोर येईलच. पण, त्याआधी प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर करत तिने पहिल्यांदाच निर्मिती केलेल्या ‘फुलवंती’ सिनेमाला या सोहळ्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केलं आहे. यामध्ये प्राजक्तासह गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, निखिल राऊत यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला दमदार प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाल्यावर आता पुरस्कार सोहळ्यात देखील ‘फुलवंती’ने आपला ठसा उमटवला आहे.
प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ सिनेमाने एक-दोन नव्हे तर तब्बल ६ पुरस्कार जिंकले आहेत. पहिल्यांदाच निर्मिती केलेल्या सिनेमाला एवढं मोठं यश मिळाल्याचं पाहून प्राजक्ताने पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. या सोहळ्याला अभिनेत्रीची आई देखील उपस्थित होती. ‘द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर’ हा विशेष पुरस्कार देऊन यावेळी प्राजक्ताचा सन्मान करण्यात आला.
प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ने जिंकले ‘हे’ पुरस्कार
‘फुलवंती’च्या आयुष्यातील क्षण आणखी फुलायला लागले…
नुकत्याच पार पडलेल्या ‘झी चित्र गौरव २०२५’ कार्यक्रमात ‘फुलवंती’ला ६ पारितोषिकं मिळाली.
१- प्राजक्ता माळी – द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर.
२- महेश लिमये – सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (Cinematographer)
३- वैशाली माढे – सर्वोत्कृष्ट गायिका
४- उमेश जाधव – सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन
५- मानसी अत्तरदे – सर्वोत्कृष्ट वेशभूषा
६- महेश बराटे – सर्वोत्कृष्ट रंगभूषाखरंतर ‘फुलवंती’मध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांचाच हा गौरव आहे. सगळ्यांचेच मनापासून आभार…. मी प्रेक्षकांची ऋणी आहे.
दरम्यान, प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “प्राजक्ता हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे”, “अभिनंदन अभिनंदन अभिनंदन प्राजू ताई”, “तुझ्या यशाची वाटचाल अशीच सुरू राहावी”, “खूप आनंद होतोय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.