‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’, ‘होणार सून मी या घरची’ छोट्या पडद्यावरील अशा अनेक मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. याचप्रमाणे ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. २५ नोव्हेंबर २०१३ ते २६ सप्टेंबर २०१५ या काळात ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जायची. या मालिकेमुळे प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर हे दोन उत्तम कलाकार मराठी कलाविश्वाला लाभले.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील पदार्पणामुळे प्राजक्ता आणि ललितला घराघरांत लोकप्रियता मिळाली. प्राजक्ता माळी रातोरात स्टार झाली आणि आज तिने गाठलेला यशाचा टप्पा आपण सगळे पाहतोच आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर प्राजक्ताने मालिकेचं शीर्षक गीत आणि शूटिंगदरम्यानचे काही फोटो एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीची पोस्ट
आज ‘जुळून येती रेशीमगाठी’ला सुरू होऊन १० वर्ष झाली.
मालिका प्रदर्शित झाल्यावर त्या पुढच्या २ वर्षात माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम. आजही प्राजक्ता इतकंच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या.)
आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलंत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत.महाराष्ट्रातील सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो, हीच यानिमित्त प्रार्थना.
बाबाजीलक्षअसूद्या
हेही वाचा : मराठी सिनेमांना कमी स्क्रीन्स का मिळतात? ‘झिम्मा २’चा दिग्दर्शक स्पष्ट मत मांडत म्हणाला, “आपली स्पर्धा थेट…”
दरम्यान, ललित आणि प्राजक्ताबरोबर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते आणि या सगळ्यांच्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली होती.