‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर तिने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. सिनेविश्वातील करिअरप्रमाणेच गेल्या काही वर्षांत वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तिने उंच भरारी घेतली आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर जुलै २०२३ मध्ये प्राजक्ताने कर्जत येथे आलिशान फार्महाऊस खरेदी केलं. हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी अभिनेत्रीने कर्ज काढलेलं आहे. याविषयी प्राजक्ता माळीने नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
प्राजक्ता माळीने फार्महाऊस खरेदी केल्यावर त्या फोटोंना खानदानातील सर्वात मोठं कर्ज असं कॅप्शन दिलं होतं. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “फार्महाऊस खरेदी करणं हे सर्वात मोठं धाडस आहे कारण, माझं एवढं बजेट नव्हतं. पण, त्या घराच्या मी पाहताक्षणी प्रेमात पडले आणि माझ्याकडची सगळी पुंजी मी पणाला लावली. ही प्रॉपर्टी माझ्याकडे आयुष्यभर राहणार हे मला माहीत होतं. त्यात मला निसर्गाची प्रचंड आवड आहे. दहा-दहा दिवस असं बाहेर जाऊन एकांतात राहायला मला खूप आवडतं. म्हणून हे घर खरेदी करण्याचा मी निर्णय घेतला.”
हेही वाचा : माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेंबद्दल पहिल्यांदा घरी सांगताच ‘अशी’ होती अभिनेत्रीच्या आईची प्रतिक्रिया
प्राजक्ता पुढे म्हणाली, “सध्या त्या फार्महाऊसचं कर्ज फेडण्यासाठी मी काम करतेच आहे. त्यात एकीकडे हास्यजत्रेत काम करत असल्याने मला आर्थिक अडचण भासत नाहीये. कारण, मला माहितीये ते हास्यजत्रेतून मला काढणार नाहीत आणि मी त्यांना सोडणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी फार्महाऊस खरेदी केलं. पण, खरंच ते खूप मोठं धाडस होतं. खरंतर, कर्जतसारखं घर मला मुंबईत हवंय पण सध्या तेवढी ऐपत नाही. भविष्यात मुंबईत असंच घर घ्यायची खूप इच्छा आहे.”
हेही वाचा : ‘सैराट’ फेम आर्चीचं खरं नाव रिंकू नव्हे तर…; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
“फार्महाऊस खरेदी करताना कुटुंबाची खूप मोठी साथ लाभली. त्या सगळ्यांनी त्यांचं सोनं गहाण ठेवलं होतं. माझ्या आईने एफडी मोडल्या, दागिने गहाण ठेवले, भावाने चैन गहाण ठेवली. आमच्या घरात फक्त माझ्या भाच्यांचं सोनं आम्ही तसंच राखून ठेवलंय बाकी सगळ्या कुटुंबीयांना मला खूप मोठी मदत केली. माझे पप्पा आणि भाऊ सुरुवातीला घाबरत होते पण, आईने पहिल्या दिवसापासून तुला योग्य वाटेल तो निर्णय घे. असं मला सांगितलं होतं. आईला नेहमीच माझ्यावर खूप विश्वास असतो.” असं प्राजक्ता माळीने सांगितलं.