मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. छोट्या पडद्यावरुन अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केलेली प्राजक्ता उत्तम नृत्यांगणाही आहे.
प्राजक्ताने नुकतीच ‘प्लॅनेट मराठी’ला मुलाखत दिली. ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील प्राजक्ताच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना प्राजक्ताने अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. या मुलाखतीत वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबाबत प्राजक्ताने अनेक खुलासेही केले. या मुलाखतीतील रॅपिड फायरमध्ये प्राजक्ताला व्यक्तींचं नाव घेतल्यानंतर एका शब्दांत त्याचं वर्णन करायचं होतं.
रॅपिड फायरमध्ये प्राजक्ताला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव पहिल्यांदा देण्यात आलं. क्षणाचाही विलंब न करता प्राजक्ताने राज ठाकरेंचा उल्लेख “डायनॅमिक” (चैतन्य असलेली गतिमान व्यक्ती) असा केला. त्यानंतर तेजस्विनी पंडितचं नाव घेताच प्राजक्ताने “उत्साही” असं म्हटलं. तर सई ताम्हणकरला “प्रेरणादायी” आणि अमृता खानविलकरला “रत्न” म्हणत एका शब्दात प्राजक्ताने त्यांचं वर्णन केलं. ललित प्रभाकरचं नाव घेताच “हॅण्डसम हंक” असं प्राजक्ता म्हणाली.
हेही वाचा>> Video: राखी सावंत प्रकरणावर उर्फी जावेदची प्रतिक्रिया, म्हणाली “तिच्याबरोबर…”
प्राजक्ताने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मधून लोकप्रियता मिळवलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या प्राजक्ताने प्रेक्षकांनाही भूरळ पाडली आहे. मालिकांप्रमाणेच मराठी चित्रपटांमध्ये काम करुन प्राजक्ताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.