‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमुळे प्रार्थना बेहेरे घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकाविश्वात ओळख निर्माण झाल्यावर पुढे तिने चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. प्रार्थनाने वैयक्तिक आयुष्यात २०१७ मध्ये अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही काळ प्रार्थनाने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. परंतु, त्यानंतर पुन्हा एकदा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.
अभिनयाशिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये प्रार्थनाने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलंय. याशिवाय ‘We नारी’ हा साड्यांचा ब्रॅण्ड तिने लॉन्च केला. काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने तिच्या वैयक्तिक युट्यूब व्हिडीओमध्ये मुंबई सोडून नवऱ्याबरोबर दुसरीकडे शिफ्ट का झाली? याबद्दल सांगितलं होतं. प्रार्थनाने मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल तिने सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
हेही वाचा : शाहरुख खानची लेक सुहाना अन् अनन्या पांडेचा IPL मधील ‘तो’ जुना फोटो व्हायरल, तुम्ही ओळखलंत का?
प्रार्थना म्हणाली, “करोना काळात आम्ही आमची अलिबागमधील जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. ती जागा अभिच्या आजोबांची आहे. त्यानंतर रो-रो बोट सुरू करण्यात आली. यामुळे प्रवासाचा खूप वेळ वाचायचा. या सगळ्याचा आम्ही विचार केला. याशिवाय त्याठिकाणी आम्ही घोडे, गायी, कुत्रे असं सगळं पाळलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी अभिला सतत अलिबागला जावं लागायचं.”
अभिनेत्री पुढे म्हणते, “अभिला प्राण्यांसाठी आठवड्यातील चार दिवस तरी तिकडे (अलिबागला) जावं लागायचं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं आपण सगळेच शिफ्ट होऊया. मालिका सुरू होती तेव्हा मी जुहूला राहायचे. पण, त्यानंतर असं वाटायचं अरे मुंबईत तशी मज्जा नाही. सतत गर्दी, वाहतूक कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं यामुळे स्वत:ला कुठेतरी वेळ देता येत नव्हता. त्यामुळे अलिबाग जाऊन समाधान मिळेल असं आम्हाला वाटलं.”
“अलिबागला गेल्यावर मी त्यांच्यामधली एक होते. मी तिथे गेल्यावर माझी पेटिंगची आवड जपते, सगळीकडे मेकअपशिवाय फिरते, झाडांची वगैरे काळजी घेते. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. यामुळेच आम्ही कायमस्वरुपी तिथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू-सासरे सुद्धा तयार झाले. त्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखी वाढलंय असं मला वाटतं. ते दोघे सुद्धा तिथे सुखी आहेत. प्रवासाच्या दृष्टीने सुरुवातीला थोडा त्रास होईल हे आम्हाला माहिती होतं. पण, आता सवय झालीये…आता काहीच वाटत नाही. आम्हाला मे महिन्यात अलिबागला शिफ्ट होऊन एक महिना पूर्ण होईल.” असं प्रार्थना बेहेरेने सांगितलं.