अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. पुढे तिने ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. २०१७ मध्ये प्रार्थनाने अभिषेक जावकरशी लग्न केलं. यानंतर काही काळ तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. २०२१ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रार्थनाने छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं. नुकतंच तिने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून प्रार्थना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवते.
हेही वाचा : “माझ्या लैंगिकतेबद्दल सर्वप्रथम…”, करण जोहरने केला शाहरुख खानबद्दल खुलासा; म्हणाला, “तो कायम…”
अभिनेत्री सध्या तिच्या ‘माय गोल्ड स्टोरी’ या नव्या व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. एका सामान्य घरातील मुलगी ते दागिन्यांच्या नामांकित कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असा प्रार्थनाने तिचा संपूर्ण प्रवास या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.
प्रार्थना लहानपणीची आठवण सांगत म्हणते, “मला आठवतंय मी इयत्ता तिसरी-चौथीत असताना माझे बाबा कापड अभियंता (टेक्सटाईल इंजिनीअर) म्हणून एका मिलमध्ये काम करायचे. एके दिवशी अचानक आम्हाला समजलं की, सगळ्या मिल्स बंद होऊन बाबांची नोकरी गेली. पुढची दोन वर्ष त्यांच्याकडे नोकरी नव्हती. हळुहळू माझ्या बाबांनी मार्केटिंगमध्ये त्यांचं करिअर केलं आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. पण, ती दोन वर्ष आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्षाचा काळ होता.”
हेही वाचा : रजनीकांत – अमिताभ बच्चन ३३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र; अभिनेत्याने केली नव्या चित्रपटाची घोषणा
प्रार्थना पुढे म्हणाली, “त्या दोन वर्षांच्या काळात बाबांना नोकरी नसल्याने आईला घर चालवण्यासाठी नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे माझी आई एका नामांकित दागिन्यांच्या दुकानात नोकरीसाठी गेली होती. तिची मुलाखत घेऊन तेव्हा माझ्या आईला रिजेक्ट करण्यात आलं होतं. आई घरी आल्यावर तिने मला घडलेला प्रकार सांगितला. तुम्ही दिसायला खूपच साध्या आहात…असं माझ्या आईला तेव्हा सांगण्यात आलं होतं. मी लहान असूनही माझ्या ती गोष्ट कायम मनात राहिली होती.”
हेही वाचा : Rajkumar Rao : राजकुमार राववर निवडणूक आयोगाने दिली खास जबाबदारी, ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्ती
“आईने सांगितलेली घटना ऐकल्यावर मी मनात ठरवलं होतं की, आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचं जेणेकरून माझ्या आई-बाबांना कुठेच रिजेक्शन मिळणार नाही… त्यांना जे हवंय ते सगळं मी देईन. पुढे, मी या क्षेत्रात काम करू लागल्यावर एक दिवस मला अचानक फोन आला आणि एका नामांकित दागिन्यांच्या कंपनीकडून ब्रॅण्ड अॅम्बेसेडरसाठी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा मी लगेच माझ्या आईला फोन करून ही गोष्ट सांगितली होती. तिला प्रचंड आनंद झाला होता. आपल्या मनात जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो याची जाणीव मला त्या क्षणाला झाली.” असं प्रार्थनाने सांगितलं.