प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची जोडी ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. २२ जुलैला गुपचूप साखरपुडा उरकत दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. आता येत्या नोव्हेंबर महिन्यात दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. परंतु, सध्या विजयादशमीच्या मुहूर्तावर शेअर केलेल्या फोटोंमुळे प्रसाद-अमृता चर्चेत आले आहेत.
प्रसाद-अमृताच्या लग्नाला आता काही दिवसच बाकी राहिले आहेत. दोघांनीही विजयादशमीच्या मुहूर्तावर पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केलं. हे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रसाद-अमृताने शेअर केलेल्य एका फोटोमध्ये हे जोडपं एका नव्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभं असून बाजूला दोघांच्या नावाच्या पाट्या लावलेल्या आहेत. या नेमप्लेटवर प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख अशी नावं मराठीत लिहिण्यात आली आहेत.
दरवाज्याच्या बाजूला प्रसाद-अमृताच्या नावाची नेमप्लेट पाहून लग्नाआधी दोघांनीही नवीन घर घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषत: त्यांच्या नावाच्या पाट्या पाहून दोघांनी नवं घर घेतलं असावं असा अंदाज सध्या प्रसाद-अमृताचे चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या फोटोंवर “१०० दिवसांच्या पाट्या १०० वर्षांसाठी एकत्र आल्या, असेच पुढे जा”, “राजकुमार-राजकुमारी आणि त्यांचं घर”, “नवीन घरासाठी शुभेच्छा” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक, दारूच्या नशेत…
दरम्यान, अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे दोघेही येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. ‘बिग बॉस’च्या या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत.