Prasad Jawade : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तब्बल दोन दिवस या सोहळ्याचं प्रसारण वाहिनीकडून करण्यात आलं. यावर्षी ‘सर्वोत्कृष्ट नायक’ या पुरस्कारवर अभिनेता प्रसाद जवादेने आपलं नाव कोरलं. प्रसाद सध्या ‘पारू’ या मालिकेत आदित्य किर्लोस्कर ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अभिनेत्याने ( Prasad Jawade ) पुरस्कार जिंकल्यावर सोहळ्यातच आपला आनंद व्यक्त केला. याशिवाय प्रसादच्या खऱ्या आयुष्यातील ‘पारू’ने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. प्रसादने २०२३ मध्ये अमृता देशमुखशी लग्नगाठ बांधली. या दोघांची ओळख ‘बिग बॉस’च्या घरात झाली होती. पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीने सर्वोत्कृष्ट नायकाच्या पुरस्कारावर मोहोर उमटवल्यावर अमृता देशमुखचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिने आपल्या नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहित त्याचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : ‘मेरे करन अर्जुन आएंगे…’, ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ब्लॉकबस्टर चित्रपट! सलमान खानने जाहीर केली तारीख…

अमृता देखमुखची पोस्ट

मी प्रसादच्या प्रेमात पडायच्या आधी त्याच्या डोळ्यांच्या प्रेमात पडले होते. अतिशय बोलके आणि भावपूर्ण डोळे… त्याच्यापेक्षा त्याचे डोळेच जास्त नीट व्यक्त होऊ शकतात खरंतर… ‘पारू’ सिरिअल मधला आदित्य बघताना त्रास होतो की, आतापर्यंत ज्या सगळ्या छटा मी बघत होते आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय! आपल्या आवडीचं एखादं not-so-explored गाणं, अचानक Viral झाल्यावर जो त्रास होतो तसं काहीसं पण, झी मराठी वाहिनी आणि ‘पारू’मुळे प्रसाद आज लोकांच्या मनात Viral होतोय हे जाणवतंय आणि छान वाटतंय! लग्न झाल्या-झाल्या मी त्याला साताऱ्यात वनवास भोगायला पाठवलं. खूप अडचणी आल्या, काही त्याने निर्माण केल्या. पण, action-cut मध्ये त्याने कधीच तडजोड केली नाही आणि त्यामुळेच त्याने ‘सर्वोत्कृष्ट नायक’ या मृगाची शिकार केली! So proud of you प्रसाद जवादे!

अमृताची ही सु्ंदर अशी पोस्ट पाहून प्रसादचं मन देखील अतिशय भरून आलं. “तू मला याच आयुष्यात एक नवा मार्ग दाखवलास आणि एक नवा जन्म दिलास. भविष्यात सुद्धा तुला माझा अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत राहीन. आय लव्ह यू सो मच बाबू” अशी रोमँटिक कमेंट करत प्रसादने ( Prasad Jawade ) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”

दरम्यान, अमृताने प्रसादसाठी ( Prasad Jawade ) लिहिलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय प्रसाद मुख्य भूमिका साकारत असलेली ‘पारू’ मालिका देखील यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मालिका ठरली आहे.