अभिनेता प्रसाद ओक(Prasad Oak) नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील त्याने साकारलेल्या भूमिकेचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. मालिका, चित्रपटांतून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. आता त्याने एका मुलाखतीत गणपतीविषयीच्या श्रद्धेविषयी भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा मी कुठल्याही गणपतीकडे बघतो; त्याचा हात…

प्रसाद ओकने नुकतीच ‘व्हायफळ’ या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने गणेशोत्सव, गणपती याबद्दल आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणी पुण्याच्या गणेशोत्सवात आम्ही मजा करायचो, असे त्याने म्हटले आहे. याबद्दल आठवण सांगताना अभिनेत्याने म्हटले, “आम्ही भावे स्कूलला असताना सगळी मुलं पहाटे अथर्वशीर्ष पठणासाठी जायचो, तर पाच मानाचे गणपती आहेत; त्यात केसरी वाड्याचादेखील गणपती आहे. आम्ही केसरी वाड्यातदेखील जायचो. तेव्हा व्हायचं काय, तर एक तर शाळेतील मुलं सामुहिक अथर्वशीर्ष पठणासाठी आलेली. साधारण २५-३० फुटांवर गणपती आणि आम्ही खाली बसलेले असायचो. बाप्पाच्या मूर्तीकडे बघितल्यावर वाटायचं की किती प्रसन्नता आहे. पण, जवळून बघता येत नाही, असं वाटायचं. हे मी चार-पाच वर्षे पाचवी ते दहावी केलं. आता मागच्या १५ दिवसांपूर्वी केसरी वाड्यामध्येच माझी आणि माझ्या बायकोची मुलाखत झाली. या मुलाखतीची सुरुवातच केसरी वाड्यातील गणपतीची आरती करून झाली. मी तिथेसुद्धा म्हटलो आणि आजही सांगतो, ज्या गणपतीला मी २५-३० फूट लांबून बघायचो, त्याच गणपतीच्या आशीर्वादाने मी त्याच्या समोर उभं राहून, त्याच्या पायांवर डोकं ठेऊन आरती करतोय. तर हा प्रवास त्याच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हता आणि यावर फार विश्वास ठेवणारा मी माणूस आहे.”

हेही वाचा: अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ मजल्यावर आहे फ्लॅट

“गणपती, त्याच्या आरत्या आणि अख्खा वाडा त्या आरत्या एकत्र जोरजोरात म्हणत असायचे. ओकांच्या वाड्यातील आरती सुरू झालीय हे दोन्हीकडच्या कॉर्नरला कळायचं. तर ती आरती आणि त्यातून आलेलं गणपतीबद्दलचं आकर्षण, हे सांगता येण्यासारखं नाही. सगळं गमतीशीर आहे. त्याच्यातून ती गणपतीबद्दलची श्रद्धा आलेली असावी. मला फार असं वाटतं, जेव्हा जेव्हा मी कुठल्याही गणपतीकडे बघतो, त्याचा हात सांगत असतो की थांब, मिळणार आहे तुला, वेळ येऊ दे, घाई करू नकोस, संयम ठेव.”

दरम्यान, प्रसाद ओक आगामी काळात अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रीलस्टार’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘जिलबी’ अशा चित्रपटांतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak on ganapati says whenever i look his hand i feel he teach me patience this journey is not possible without his blessing softnews nsp