गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन आता मराठी संगीत विश्वातील लाडकी व लोकप्रिय जोडी झाली आहे. लग्न झाल्यापासून दोघं सतत चर्चेत असतात. लग्नानंतर घडत असलेले आनंदाचे क्षण आवर्जुन सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी मुग्धाला भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत सुवर्ण पदक मिळालं. हा आनंदाचा क्षण दोघांनी चाहत्यांबरोबर शेअर केला. यानिमित्ताने प्रथमेशने लाडक्या बायकोचं कौतुक करण्यासाठी खास पोस्ट लिहिली. यामुळे मुग्धावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
आता प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा प्रसंग घडला. हा प्रसंग प्रथमेशने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या प्रसंगाचे काही फोटो शेअर करत प्रथमेशने लग्नानंतर पहिल्यांदाच घडलेला हा आनंदाचा क्षण सांगितला आहे.
प्रथमेश कॅप्शनमध्ये लिहित सांगितलं, “आजि आनंद आनंद | मनी भरला पूर्णानंद | वाचे बोलता तो न ये | बुद्धिबोध बोध स्तब्ध राहे ॥ परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पदसंग्रहातील या ओळींची प्रत्यक्ष अनुभूती मागच्या आठवड्यात आली. सांगलीला चितळे बंधू यांच्या सुरश्री संगीत महोत्सवात माझं आणि मुग्धाचं गाणं होतं. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या प्रचंड लाडक्या श्रद्धास्थानांपैकी एक श्री नृसिंहवाडी येथे श्रीदत्त महाराजांच्या कृपेने लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला. नेहमीप्रमाणेच दक्षिणद्वाराशी गायनसेवाही झाली. अतिशय प्रसन्न वातावरणात अप्रतिम दर्शन घडलं. दक्षिणद्वाराशी गायनसेवा झाल्यावर डोळे उघडताच समोर श्री संकेश्वर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचं दर्शन झालं. हा दुग्ध शर्करा योगच!!”
“त्याच दिवशी संध्याकाळी आयुष्यात पहिल्यांदा श्री क्षेत्र औदुंबर येथे जाऊन दर्शनाचा आणि तिथेही महाराजांसमोर बसून गायनसेवेचा योग आला. महाराजांना गायनसेवा अतिप्रिय आहे आणि महाराज ही सेवा नेहमी आमच्याकडून करुन घेतात हे आमचं परमभाग्य आहे. एकाच दिवशी श्री मनोहर पादुका आणि श्री विमल पादुकांच्या दर्शनाचा लाभ होणं व दोन्ही स्थानी महाराजांजवळ बसून गायनसेवा करायला मिळणं हे श्री महाराजांच्या कृपेशिवाय शक्यच नाही. याच प्रसंगीचे काही फोटो आपल्याशी शेअर करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…,” हा आनंदाचा प्रसंग प्रथमेशने सांगितला.
प्रथमेशच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खूप छान संस्कार, हे माझं गावं आहे’, ‘सदैव आशीर्वादित राहा. अशीच गायनसेवा सदोदित घडत राहो’, ‘खूप छान सेवा योग’, अशा प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – हातात कुबड्या, कमरेला पट्टा: हृतिक रोशनला नेमकं झालंय तरी काय? जाणून घ्या…
दरम्यान, ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेले प्रथमेश व मुग्धा गेल्या वर्षी २१ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. दोघांचं मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीत लग्न झालं. तेव्हापासून दोघं वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात.