‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मोठा बदल झाला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधानने अचानक मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे सध्या तेजश्री चाहत्यांसह ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. ‘तू मालिका सोडू नकोस’, ‘मालिका सोडण्यामागचं कारण काय?’, अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. आता नवी मुक्ता साकारणाऱ्या अभिनेत्रीने चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे. लवकरच स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. स्वरदाने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. “नवीन वर्षाची नवी सुरुवात”, असं तिने त्या फोटोवर लिहिलं होतं. स्वरदाची ही इन्स्टाग्राम स्टोरी अनेक एंटरटेनमेंट पेजवर शेअर करण्यात आली आहे. यावरच एका युजरने खोचक प्रतिक्रिया दिली होती.
‘मराठी सीरियल ऑफिशियल’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर स्वरदा ठिगळेची स्टोरी शेअर करण्यात आली होती. ज्यावर एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं, “रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये. त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांची बऱ्याचदा तुलना होते आणि तिरस्कार सहन करावा लागतो.” यावर ‘मराठी सीरियल’ पेजने प्रत्युत्तर दिलं की, हे खरं आहे. अगदी खरं आहे. पण ते त्यांचं काम करत आहेत. तुलना होणारच आहे. पण एक उदाहरण, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाची रिप्लेसमेंट चांगली होती. रुपाली सगळ्यांना आवडली. तर बघूयात…’प्रेमाची गोष्ट’चं काय होतंय?
स्वरदा ठिगळेने याच युजरच्या प्रतिक्रियेचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणाली, “आजही कलेचे असे जेन्युइन फॅन्स आहेत म्हणून कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते. माझ्या नव्या कामासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार.”
दरम्यान, स्वरदा ठिगळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिने ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केलं. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकेत झळकली. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.