Premachi Goshta Marathi Serial : मराठी टेलिव्हिजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. या मालिकेत तेजश्री ‘मुक्ता’ हे पात्र साकारत होती. तिने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, तेजश्रीच्या ऐवजी आता मुक्ताच्या रुपात सेटवर नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे.
तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत झळकणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर स्वरदाने सेटवरचा पहिला फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “नवीन वर्ष, नवीन सुरुवात” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रिप्टमध्ये इंद्रा, लकी, मुक्ता यांची नावं स्पष्टपणे दिसत आहेत. यावरून स्वरदाच मालिकेत मुक्ताचं पात्र साकारणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.
हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सप्टेंबर २०२३ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेजश्री छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याने या मालिकेकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्याच आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ला चांगला टीआरपी मिळाला होता. इतकंच नव्हे तर, ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम टॉप-५ मध्ये असते.
आता मुख्य भूमिका साकारणाऱ्या तेजश्रीची मालिकेतून एक्झिट झाल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. आता अभिनेत्री पुन्हा कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर, दुसरीकडे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये आता तिच्याऐवजी अभिनेत्री स्वरदा ठिगळेची एन्ट्री झालेली आहे. स्वरदा इथून पुढे ‘मुक्ता’ची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, स्वरदा ठिगळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०१३ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. २०१७ मध्ये तिने हिंदी मालिकेत काम केलं होतं. याशिवाय ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत स्वरदा प्रमुख भूमिकेत झळकली होती. आता लवकरच स्वरदा प्रेक्षकांना मुक्ताच्या भूमिकेत दिसेल.