गेल्या वर्षा अखेरीस ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळे लग्नबंधनात अडकला. नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चैत्राली पितळेशी राजसने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात राजस सुळेचं लग्न झालं होतं. त्यानंतर दोन महिन्यांनी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आणखीन एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. तेजश्री प्रधानने अभिनेत्याचा लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
राजस सुळेनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील लकी म्हणजे अभिनेता आयुष्य भिडे लग्नबंधनात अडकला आहे. आयुष्यने अभिनेत्री, डान्सर कोमल पटेल हिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नात खास दोघांनी ऑफ व्हाइट रंगाचा पेहराव केला होता. आयुष्यची पत्नी कोमलने ऑफ व्हाइट रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता. ज्यावर तिने लाल रंगाची ओढणी आणि बांगड्या घातल्या होत्या. तर आयुष्य ऑफ व्हाइट रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आयुष्यच्या लग्नासाठी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांनी खास हजेरी लावली होती. दिग्दर्शक विघ्नेश कांबळे, राज हंचनाळे, राजस सुळे, नरेंद्र केरेकर, इरा परवडे, कोमल सोमारे गजमल, लक्ष्मी चापोरकर हे कलाकार आयुष्यच्या लग्नात उपस्थित राहिले होते.
तेजश्री प्रधानने इन्स्टाग्राम स्टोरीवर आयुष्य भिडे व कोमल पटेलचा फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. तेजश्रीने फोटोवर लिहिलं, “आयुष्य तुला वैवाहिक जीवन आनंददायी जावो या शुभेच्छा.” तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष्य व कोमलचा संगीत सोहळ्यातला लूक पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आयुष्य भिडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आयुष्यने साकारलेली लकी ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आयुष्य आता घराघरात पोहोचला आहे. याआधी आयुष्यने ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये काम केलं होतं. या मालिकेत त्याने निल कामतची भूमिका साकारली होती.
तसंच तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत झळकला होता. त्याने ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सुधीर ही भूमिका निभावली होती. याशिवाय आयुष्य ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत निराजी रावजी पंत भूमिकेत झळकला होता. आयुष्य अभिनयाबरोबरच नाटक दिग्दर्शन करतो. त्याने ‘घोर’ नावाचं दीर्घांक आणि ‘काठ’ नावाची एकांकिका दिग्दर्शित केली होती. यामध्ये त्याने स्वतः कामदेखील केलं होतं.