Premachi Goshta Fame Actress Amruta Bane : ‘कन्यादान’ फेम अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांचा विवाहसोहळा एप्रिल महिन्यात पार पडला होता. या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर अमृताचा सासरी अगदी हटके पद्धतीत गृहप्रवेश करण्यात आला होता. शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या सासऱ्यांनी लाडक्या सुनबाईंच्या स्वागतासाठी सगळी तयारी करून ठेवली होती.
सासऱ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सुनेचं स्वागत केल्याचं पाहून सगळेच या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत होते. अनेकांनी अमृताच्या पोस्टवर असे सासरे सर्वांना मिळूदेत अशाही कमेंट्स केल्या होत्या. याच लाडक्या सासऱ्यांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने खास पोस्ट लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अमृता बनेची सासऱ्यांसाठी खास पोस्ट
अमृता बने म्हणाली, “आपण जन्माला आल्यावर कोणती माणसं आपल्या आयुष्यात येणार याचा चॉईस आपल्याकडे नसतो. त्यामुळे माझ्या प्रारब्धात असलेली आणि देवाने फारच विशेष चॉईस करून पाठवलेल्या खास व्यक्तींमधली ही माझ्या आयुष्यातली खास व्यक्ती… ते म्हणजे माझे सासरे वासुदेव एकबोटे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #खासरेसासरे”
“आज जेव्हा मला सगळे म्हणतात की, छान, मनमोकळे आणि ‘कूल’ आहेत तुझे सासरे… तेव्हा एक पैसा भारी नक्कीच वाटतं पण, त्याचबरोबर त्यांचं असं असण्यामागे देवाने चॉईस करून पाठवलेली माणसं यांना आपल्या आयुष्यात धरून आणि टिकवून ठेवण्यासाठी ते जे मानसिक, शारीरिक आणि वैचारिक कष्ट घेतात याचा खरंच खूप हेवा वाटतो. असा सहज आणि सोपेपणा मला आणि शुभंकरला वारसा म्हणून मिळाला आहे त्यासाठी थँक्यू. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” अशी पोस्ट अभिनेत्रीने आपल्या सासऱ्यांसाठी शेअर केली आहे.
अमृता बनेचा नवरा शुभंकर एकबोटे यावर कमेंट करत लिहितो, “अमू… खूप छान आणि मनापासून लिहिलं आहेस! खरंच खूप blessed आणि lucky आहोत आपण… तुझ्यासाठी आयुष्याच्या या टप्प्यात आणि माझ्यासाठी अगदी जन्मापासून बाबा माझ्याबरोबर आहे. अगदी आजही मला सांभाळतो आहे.”
दरम्यान, नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अमृता बनेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) मालिकेत मिहिका ही भूमिका साकारत आहे.